ई-कचऱ्याच्या लिलावाला स्थगिती
By Admin | Updated: May 27, 2015 02:34 IST2015-05-27T02:34:11+5:302015-05-27T02:34:11+5:30
कार्यालयातील जुने संगणक, प्रिन्टर, स्कॅनर व टोनर या साहित्याचा महापालिकेच्या समान्य प्रशासन विभागाने ई-कचऱ्यात समावेश करून ...

ई-कचऱ्याच्या लिलावाला स्थगिती
नागपूर : कार्यालयातील जुने संगणक, प्रिन्टर, स्कॅनर व टोनर या साहित्याचा महापालिकेच्या समान्य प्रशासन विभागाने ई-कचऱ्यात समावेश करून त्याची कवडीमोल भावाने विक्री करण्याची तयारी केली होती. यासाठी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु‘लोकमत’ ने या संदर्भातील घोटाळा पुढे आणल्याने स्थायी समितीने ई-कचऱ्याच्या लिलावाला स्थगिती देण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेतला. जुने संगणक, प्रिन्टर, स्कॅनर व टोनर या साहित्याचा ई-कचऱ्यात समावेश करून ९४४८२ रुपयाला विक ण्याचे ठरविले होते. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. साहित्याचे बाजारमूल्य अधिक असल्याने लिलावाला स्थगिती दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली.
अतिरिक्त उपायुक्त यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आले. यात समितीच्या दोन सदस्यांचा समावेश राहणार आहे.
ही समिती या प्रकरणाची चौकशी करून प्रत्येक साहित्याची बाजारभावानुसार किंमत निश्चित करणार आहे. समितीच्या अहवालानंतर लिलावाचा निर्णय घेतला जाणार आहे.
ई-कचऱ्याचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नॅशनल इन्फारमेटीक्स सेंटर (एनआयसी)यांना विनंती केली होती. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने मनपाने सरकारी मूल्यांककाची मदत घेतली. (प्रतिनिधी)
पाच वर्षांनी
होतो लिलाव
मनपा प्रशासनाकडून नवीन साहित्य खरेदीचा प्रस्ताव येतो. त्यानुसार लाखो रुपयाची उपकरणे खरेदी केली जातात. परंतु ई -कचऱ्याचे दर्शविण्यात आलेले संभाव्य मूल्य फारच कमी त्यामुळे फेरमूल्यांकनाचे निर्देश दिल्याची माहिती रमेश सिंगारे यांनी दिली. अशा स्वरूपाचा लिलाव दर पाच वर्षांनी केला जातो. त्यामुळे हा प्रस्ताव समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.