पार्किन्सन रोगावर शस्त्रक्रिया प्रभावी
By Admin | Updated: October 24, 2016 02:48 IST2016-10-24T02:48:52+5:302016-10-24T02:48:52+5:30
पार्किन्सन (कंपवात) हा मेंदूशी निगडित दीर्घकालीन चालणारा रोग आहे. मेंदूतील न्यूरो ट्रान्समीटर ‘डोपेमाई’ सतत कमी होत जाते.

पार्किन्सन रोगावर शस्त्रक्रिया प्रभावी
मिलिंद देवगावकर यांची माहिती : विदर्भ सर्जन्स असोसिएशनच्या परिषदेचा समारोप
नागपूर : पार्किन्सन (कंपवात) हा मेंदूशी निगडित दीर्घकालीन चालणारा रोग आहे. मेंदूतील न्यूरो ट्रान्समीटर ‘डोपेमाई’ सतत कमी होत जाते. यात रुग्णाला संतुलन सांभाळणे कठीण होते आणि पडण्याच्या घटना वाढतात. काही रुग्णांना आपल्या हाताने जेवणही करणे शक्य होत नाही. त्यांना आपल्या दैनंदिन कार्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या रोगावर आता विशेष शस्त्रक्रिया प्रभावी ठरत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद देवगावकर यांनी येथे केले.
विदर्भ सर्जन्स असोसिएशनतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ‘व्हीसेकॉन-२०१६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मुकुंद ठाकूर, सचिव डॉ. संजय घाटे, डॉ. राजेश सिंघानिया, परिषदेचे अध्यक्ष डॉ. गिरीश जाटकर, सचिव डॉ. प्रशांत रहाटे, डॉ. मिलिंद देवगावकर, डॉ. एस. दासगुप्ता व डॉ. राज गजभिये उपस्थित होते. डॉ. देवगावकर म्हणाले, पार्किन्सन हा रोग दीर्घकालीन आहे. यामुळे रुग्ण नैराश्य आणि अस्वस्थेला बळी पडतो. त्याचे मानसिक धैर्य कमी होते. स्मृतीवरही प्रभाव पडतो. त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत अडथळे येतात. परिणामी, ही शस्त्रक्रिया अशा रुग्णांसाठी वरदान ठरणारी आहे.
डॉ. अली झमीर खान यांनी रोबोटिकच्या मदतीने फफ्फुसांवरील शस्त्रक्रियेची माहिती दिली. त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेचे महत्त्व सांगून रोबोटिकद्वारे फफ्फुसाचा कर्करोग, क्षयरोग, ट्यूमरवरील शस्त्रक्रियेवर प्रकाश टाकला. या परिषदेत, ‘अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी’ची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. परिषदेत विदर्भातून ४५० वर शल्यचिकित्सक उपस्थित होते. मेडिकलच्या शस्त्रक्रियागृहातून १२ शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण या परिषदेत करण्यात आले होते. त्यावर सखोल चर्चा झाली. परिषदेला देशासोबतच पाश्चात्य देशातील प्रसिद्ध शल्यचिकित्सकही सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)