लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायदे तयार करणे हे संसदेचे काम आहे. संसदेत बहुमताने कायदा मंजूर झाला असेल तर सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या चौकटीत राहूनच आपले मत व्यक्त करावे. स्वत:ला सुप्रीम समजू नये. जेथे कायदे तयार होतात, ती संसद हीच सुप्रीम आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले नागपुरात आले असता रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वक्फ बोर्डाच्या नवीन कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतासंदर्भात त्यांनी उपरोक्त शब्दात आपले मत व्यक्त केले. केंद्र सरकारने सुधारित केलेला वक्फ बोर्ड कायदा हा मुस्लीम बांधवांच्या हिताचा आहे, परंतु विरोधक याचे राजकीय भांडवल करीत आहेत, ते मुस्लीम बांधवांची दिशाभूल करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन भारताच्या विरोधात बोलू नये, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळसाहेब घरडे, विनोद थुल, विजय आगलावे, डॉ. मनोज मेश्राम, तेजराव वानखेडे उपस्थित होते.
मराठीच्या नावावर दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई व्हावीहिंदी भाषेला होत असलेल्या विरोधाबद्दल बोलताना आठवले म्हणाले, राष्ट्रभाषेला विरोध करणे योग्य नाही. मराठीचा आग्रह धरणे ठिक आहे. परंतु दादागिरी करीत लोकांना त्रास देणे योग्य नाही, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई करावी, असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी अमेरिकेतील लोकांची मागणीइंग्लंडप्रमाणे अमेरिकेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे, अशी अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांची मागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेलो हेतो. बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेल्या तेथील कोलंबिया विद्यापीठासह इतरही काही भागात भेटी दिल्या. तेव्हा तेथील नागरिकांकडून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार व्हावे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.