तंबाखूची ‘सुगंधित तोडपाणी’ दडपणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:46+5:302021-07-19T04:06:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - तोडपाणी करून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा भरलेले वाहन सोडून देणाऱ्या लकडगंज पोलिसांच्या संशयास्पद कारवाईला ...

Suppress tobacco 'fragrant water'? | तंबाखूची ‘सुगंधित तोडपाणी’ दडपणार ?

तंबाखूची ‘सुगंधित तोडपाणी’ दडपणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - तोडपाणी करून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा भरलेले वाहन सोडून देणाऱ्या लकडगंज पोलिसांच्या संशयास्पद कारवाईला दडपण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या प्रकरणाची चाैकशी करीत असल्याचे वरिष्ठांकडून सांगितले जात असले तरी त्याचे स्वरूप कसे आहे, ते स्पष्ट झालेले नाही.

बुधवारी १४ जुलैला दुपारी लकडगंजमध्ये स्मॉल फॅक्टरी एरियात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा आणि तत्सम पदार्थ असलेले वाहन लकडगंज रोखले. सूत्रांच्या माहितीनुसार, या वाहनात ५० ते ६० लाखांचा प्रतिबंधित मालाचा साठा होता. सरकार आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून या मालाची तस्करी केली जात होती. त्यामुळे लकडगंज पोलिसांकडून हे वाहन ताब्यात घेऊन चालक तसेच मालक आणि ज्याने हा माल पाठवला त्याची कसून चाैकशी करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांनी तसे काहीही केले नाही. ‘अर्थपूर्ण बोलणी’ झाल्यानंतर हे वाहन जागेवरच सोडून देण्यात आले. त्यानंतर लाखोंची तोडपाणी करून वाहन सोडल्याची जोरदार चर्चा लकडगंजमध्ये पसरली.

‘लोकमत’ने या संशयास्पद कारवाईचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर हादरलेल्या लकडगंज पोलिसांनी सावरासावर केली. प्रारंभी अशा कोणत्याही वाहनाची आम्ही तपासणी किंवा चाैकशी अथवा कारवाई आमच्याकडे झाली नसल्याचे लकडगंज पोलिसांनी सांगितले. नंतर मात्र आम्हाला लाखोंचा प्रतिबंधित माल येणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार, पोलीस पथकाने संशयित वाहन पकडले. मात्र, त्या वाहनात काहीच नव्हते, अशी बतावणी पोलीस अधिकाऱ्यांनी केली. हे वाहन पोलीस ठाण्यात चाैकशीसाठी का आणण्यात आले नाही, वाहन रिकामे असल्याचा दावा कोणत्या आधारे केला जात आहे, या प्रश्नांचे उत्तर मात्र लकडगंज पोलिसांकडून मिळाले नाही. त्यामुळे लाखोंची लेणदेण झाल्याच्या चर्चेला बळ मिळत आहे. दरम्यान, लोकमतने हे प्रकरण लावून धरल्यानंतर पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी या गंभीर प्रकाराची चाैकशी करीत असल्याचे सांगितले. मात्र, चाैकशीचे स्वरूप स्पष्ट झाले नाही.

---

दलाल सक्रिय

या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर सडकी सुपारी, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा आदीच्या तस्करीशी संबंधित असलेले आणि लकडगंज पोलिसांशी सलगी साधून असलेले दलाल अचानक सक्रिय झाले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत.

---

यशोधरानगर अन् लकडगंज

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे धान्याची काळाबाजारी आणि तंबाखू तसेच सुपारीची तस्करी होत होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याने पोलिसांची प्रतिमा डागाळणारे प्रकरण महिनाभरापूर्वी घडले. एका उपनिरीक्षकासह चार जण त्यात निलंबित झाले. संपूर्ण पोलिस दलाची त्यामुळे बदनामी झाली. आता लकडगंजमध्ये काय होते, त्याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

---

Web Title: Suppress tobacco 'fragrant water'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.