शिधापत्रिकाधारकांना सडक्या गव्हाचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:42+5:302020-12-26T04:07:42+5:30
राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : शासनाच्यावतीने दारिद्र्य रेषेवरील, खालील व अंत्याेदय लाभार्थ्यांना शिधापत्रिकांवर स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून ...

शिधापत्रिकाधारकांना सडक्या गव्हाचा पुरवठा
राम वाघमारे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : शासनाच्यावतीने दारिद्र्य रेषेवरील, खालील व अंत्याेदय लाभार्थ्यांना शिधापत्रिकांवर स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून कमी किमतीत नियमित धान्य पुरवठा केला जाताे. नांद (ता. भिवापूर) येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक-१५ मध्ये डिसेंबरमध्ये जाे गहू पुरविण्यात आला, त्यातील बहुतांश गहू हा सडका व कुजका आहे. हा बुरशी लागलेला गहू खाल्ल्याने नागरिकांना विषबाधा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नांद येथील परवानाधारक स्वस्त धान्याचे दुकान (क्रमांक-१५) तक्रारींमुळे वादग्रस्त ठरल्याने पुरवठा विभागाने चाैकशी केली. यात सत्यता आढळून येताच पुरवठा विभागाने दुकानदाराचा परवाना निलंबित करीत ते दुकान दुसऱ्या दुकानदाराला चालवायला दिले. त्यानंतर या दुकानातून नियमित धान्य वितरण सुरू हाेताच पाेत्यांमध्ये सडका व कुजका गहू आढळून आल्याने लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा गहू गुरेही खाणार नाही, या प्रतीचा असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले.
या दुकानाला (क्रमांक-१५) एकूण ४६६ शिधापत्रिकाधारक जाेडले आहेत. त्यांच्या शिधापत्रिकांवरील युनिटनुसार दुकानाला दर महिन्याला पुरवठा विभागाकडून धान्य पुरवठा केला जाताे. काेणताही लाभार्थी धान्याविना राहणाार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र, या महिन्यात काही लाभार्थ्यांच्या वाट्याला हा सडका गहू आला आहे. बुरशीने काळवंडलेला व उग्र वास येत असलेला हा गहू खायचा कसा, असा प्रश्न लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी तालुका पुरवठा अधिकारी सुखदेव बाेधी यांना भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
...
कमी धान्य पुरवठा
नांद येथील दुकान क्रमांक-१५ ला दर महिन्याला ४६६ लाभार्थ्यांना पुरेल एवढे धान्य वाटप करण्यासाठी दिले जाते. डिसेंबरमध्ये ३२० लाभार्थ्यांना पुरेल एवढाच धान्यपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित १४६ लाभार्थ्यांना एक तर धान्य मिळणार नाही किंवा इतरांना कमी धान्य देऊन त्यांच्या वाट्याचे धान्य या लाभार्थ्यांना दिले जाईल. कमी धान्य मिळाल्यास लाभार्थी तक्रार करण्याची भीती असल्याने १४६ लाभार्थ्यांना धान्य मिळण्याची शक्यता सध्या मावळली आहे.
....
धान्य खरेदीचा भुर्दंड
ज्या लाभार्थ्यांना हा सडका गहू मिळला आहे, ताे खाण्याच्या लायकीचा नसल्याने ते खाणार नाहीत. ताे गहू गुरांच्याही आराेग्यास धाेकादायक असल्याने कुणी खरेदीही करणार नाही. पाेत्यांमधील काही गहू कमी तर काही अधिक सडका आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना तसेच दुकानाला कमी धान्य पुरवठा करण्यात आल्याने १४६ लाभार्थ्यांना पदरमाेड करून बाजारातून चढ्या भावाने गहू किंवा ज्वारी खरेदी करावी लागणार असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.