मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात घाणेरड्या पाण्याचा पुरवठा, निकटवर्तीय आमदार संदीप जोशी संतापले
By योगेश पांडे | Updated: August 4, 2025 20:00 IST2025-08-04T19:59:26+5:302025-08-04T20:00:27+5:30
Nagpur : स्ववलंबी नगर आणि दीनदयाल नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना घाणेरडं, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास धोकादायक पाणी पुरवठा

Supply of dirty water in the Chief Minister's own constituency, close MLA Sandeep Joshi is angry
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विधानपरिषद सदस्य संदीप जोशी यांनी मनपा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील स्ववलंबी नगर आणि दीनदयाल नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना घाणेरडं, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास धोकादायक पाणी पुरवठा केला जात आहे. या गंभीर समस्येकडे नागपूर महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांना पत्रदेखील पाठविले आहे.
या भागात गेल्या १५ ते २० दिवसांपासून नळांमधून दुर्गंधीयुक्त, गढूळ आणि वापरण्यायोग्य नसलेलं पाणी येत असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्री असलेल्या मतदारसंघात जर ही परिस्थिती असेल तर शहराच्या इतर भागांत काय चालू असेल याची कल्पनाच करवत नाही. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन गप्प असेल, तर सामान्य जनतेचा आवाज कुणी ऐकायचा असा संतप्त सवाल जोशी यांनी केला आहे.
नागरिक सोशल मीडियावर सातत्याने तक्रारी पोस्ट करत आहेत. मीही प्रत्यक्ष या तक्रारी अनुभवल्या आहेत. अनेकांनी पाण्यामुळे त्रास होतोय असं स्पष्ट सांगितलं आहे. तुम्ही गप्प बसलात, म्हणून आम्हीही गप्प बसू, असा गैरसमज करू नका. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नाही तर परिसरातील जनतेसह मी स्वत: गुरुवार ७ ऑगस्ट रोजी आयुक्तांच्या कार्यालयात धडक देईन. नागरिकांच्या रोषाला आयुक्तांना सामोरे जावे लागेल. लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला तर ती संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाची असेल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे..