उपराजधानीत अन्न चाचणी प्रयोगशाळा

By Admin | Updated: June 3, 2015 02:36 IST2015-06-03T02:36:33+5:302015-06-03T02:36:33+5:30

अन्न व औषध विभागाची अन्न चाचणी प्रयोगशाळा नागपुरात या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असून भेसळयुक्त पदार्थांचा गुणात्मक व दर्जात्मक

Supplementary Food Testing Laboratory | उपराजधानीत अन्न चाचणी प्रयोगशाळा

उपराजधानीत अन्न चाचणी प्रयोगशाळा

मोरेश्वर मानापुरे नागपूर
अन्न व औषध विभागाची अन्न चाचणी प्रयोगशाळा नागपुरात या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असून भेसळयुक्त पदार्थांचा गुणात्मक व दर्जात्मक अहवाल तातडीने मिळून संबंधितांवर कारवाई करणे विभागाला शक्य होणार आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.
तीन विश्लेषकांची नियुक्ती
जवळपास २ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेली प्रयोगशाळा भूगांवकर सभागृह, ओंकारनगर रोड, मानेवाडा रिंग रोडवर ५५०० चौरस फूट जागेत आहे. जवळपास ६० लाख रुपयांची १६ उपकरणे बसविण्यात आली आहेत. स्वत:च्या सॅम्पलद्वारे प्रत्येक उपकरणाची तंतोतंत चाचणी आणि शहानिशा विश्लेषकांद्वारे करण्यात येत आहे. उपकरणे योग्य आहेत वा नाहीत, शासनाच्या प्रमाणकानुसार (स्टॅन्डर्ड) उपकरणांद्वारे अहवाल मिळतो वा नाही, हा या चाचणीचा उद्देश आहे. प्रारंभी अन्न पदार्थांची चाचणी, त्यानंतर नव्याने उभारण्यात येणाऱ्या उपकरणांद्वारे औषधांचीही चाचणी या प्रयोगशाळेत होणार आहे. नव्या उपकरणांच्या प्रस्तावाला वित्त विभागाकडून मान्यतेची प्रतीक्षा आहे. प्रयोगशाळेत औरंगाबाद येथून तीन विश्लेषक प्रतिनियुक्तीवर आले आहेत. याशिवाय लिपिकाची नियुक्ती केली असून दुसऱ्याची लवकरच करण्यात येणार आहे. या सर्वांना मुंबई येथील मुख्यालयात गेल्या आठवड्यात प्रशिक्षण देण्यात आले. सध्या ते प्रयोगशाळेत कार्यरत आहेत. याशिवाय गेल्या आठवड्यातच प्रयोगशाळेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रत्यक्ष काम या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (औषधी) अशोक गिरी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नव्याने भरती होणार
अन्न चाचणी प्रयोगशाळेत ११० जणांच्या भरतीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाकडे पाठविला आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रयोगशाळेत सहायक संचालक दर्जाचा अधिकारी राहील. जागा भाडे तत्त्वावर ताब्यात घेतल्यानंतर प्रयोगशाळेची विभागवार रचना आणि उपकरणे बसविण्यासाठी एक वर्ष लागले.
अन्न पदार्थांची गुणात्मक व दर्जात्मक चाचणी
अन्न पदार्थांच्या गुणात्मक आणि दर्जात्मक चाचणीचा अहवाल १४ दिवसांत मिळावा, असा कायदा आहे. पदार्थातील घटक आणि दर्जाच्या आधारे मिळणाऱ्या अहवालाद्वारे अन्न विभागाला संबंधितांवर कठोर कारवाई करणे शक्य होईल. सध्या बाजारात मिळणारे दूध, तूप, लोणी, तेल, डाळी, धान्य, कडधान्य, मैदा, रवा आदी जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. प्रयोगशाळा नागपुरात असल्यामुळे विभागाला एखाद्या वेळी अन्न पदार्थाचा अहवाल तातडीने मिळविणे शक्य होणार असल्याचे गिरी म्हणाले. चर्चेदरम्यान प्रयोगशाळा विश्लेषक अभय कऊटकर उपस्थित होते.

Web Title: Supplementary Food Testing Laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.