मजुरांनी केली सुपरवायजरची हत्या; पोलिसांनी धावत्या बसला अडवून तिघांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 14:50 IST2021-02-19T14:50:04+5:302021-02-19T14:50:28+5:30
Nagpur News नाईट ड्युटीवर जायला सांगितले म्हणून वृद्ध सुपरवायजरला मारहाण करून तीन मजुरांनी त्याची हत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगरात गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.

मजुरांनी केली सुपरवायजरची हत्या; पोलिसांनी धावत्या बसला अडवून तिघांना केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नाईट ड्युटीवर जायला सांगितले म्हणून वृद्ध सुपरवायजरला मारहाण करून तीन मजुरांनी त्याची हत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगरात गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.
सम्हारू अवधू हरिजन (वय ६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. तो मुळचा खुरमाखास, रुद्रपूर (जि.देवरिया, यूपी) मधील रहिवासी होता. संजिवा नामक त्याच्या भाच्याने मेट्रोच्या वायरिंगचे कंत्राट घेतले. त्यामुळे २०१८ पासून सम्हारू नागपुरात राहायला आला. कामावरच्या मजुरांच्या हजेरी लावून त्यांचे पगार काढण्याचे काम सम्हारू करायचा. आरोपी दिनेशकुमार मुन्ना लाला (वय २३),बजरंगी लालचंद्रप्रसाद गाैतम (वय २१) आणि सुशीलकुमार दीपचंद गाैतम (वय १९, तिघेही रा. मोहम्मदपूर पुहाया, जि.शहाजानपूर, यूपी) हे सम्हारू सोबत मजुरांच्या झोपड्यात लोकमान्यनगरात राहायचे. गांधीबागमध्ये त्यांचे काम सुरू होते. कंत्राटदाराचे वाहन त्यांना तेथून कामावरच्या ठिकाणी नेऊन सोडायचे आणि परत घेऊन यायचे.
गुरुवारी दिवसभर काम करून ते रात्री झोपड्यांवर परतले. स्वयंपाक करून जेवायचे आणि झोपायचे, अशा तयारीत असताना रात्री ८ च्या सुमारास सम्हारूने या तिघांना कामावर (नाईट ड्यूटी)वर जाण्यास सांगितले. थकूनभागून आताच कामावरून परत आल्याचे सांगून आरोपींनी नाईट ड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे सम्हारू त्यांच्यावर ओरडला. सम्हारू शिवीगाळ करीत असल्याचे पाहून दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी त्याच्यासोबत वाद घालून त्याला मारहाण केली. आरोपी दिनेशकुमार याने जवळचा चाकू काढून सम्हारूच्या छातीवर वार केला. त्यामुळे सम्हारूचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, आरडाओरड ऐकून आजुबाजुची मंडळी धावली. तोपर्यंत आरोपी पळून गेले. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. विक्रांत श्रीकिशन प्रसाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
जबलपूरला पळून जाणार होते
आरोपी दिनेशकुमार, बजरंगी आणि सुशिलकुमार हे जबलपूरला जाण्यासाठी बसमध्ये बसले. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे कॉल लोकेशन काढून त्यांना कामठी मार्गावर धावत्या बसला अडवून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी आटोपल्यानंतर त्यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे.