अलौकिकतावादाची उभारणी करणारे द.भि. सर
By Admin | Updated: January 28, 2016 02:55 IST2016-01-28T02:55:51+5:302016-01-28T02:55:51+5:30
१९७२ साली एम.ए.चा विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या मराठी विभागात मी प्रवेश घेतला. तेव्हा द.भि. सर अगदी ३८ वर्षांचे होते. तारुण्याच्या जोशात होेते.
अलौकिकतावादाची उभारणी करणारे द.भि. सर
डॉ. अक्षयकुमार काळे
१९७२ साली एम.ए.चा विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या मराठी विभागात मी प्रवेश घेतला. तेव्हा द.भि. सर अगदी ३८ वर्षांचे होते. तारुण्याच्या जोशात होेते. तेव्हा ते साहित्यशास्त्र अम्हाला शिकवायचे. अभिनव गुप्त, संत ज्ञानेश्वर, ग. त्र्यं. देशपांडे ही त्यांची भारतीय साहित्य शास्त्राला अनुसरून असणारी श्रद्धास्थाने होती. सरांसाठी रसव्यवस्था अडगळ नव्हती. एकूणच अभिनव गुप्तचा अलौकिततावाद त्यांना प्रिय होता. तो अलौकिकवाद आणि शब्दशक्तीविचार हा त्यांच्या समीक्षेचा मलभूत पाया हता. आपल्या नव अलौकिकतावादाची उभारणी त्यांना याच पायावर करायची होती. आपल्या शिष्यांनाही अलौकिकतावादी बनवण्याकडे त्यांचा कल होता. ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादाने त्यांचे मन पुरते भावले होते.
दुसरा महत्त्वाचा ग्रंथ अभ्यासाला होता तो सौंदर्य आणि साहित्य. सर मर्ढेकरांच्या साहित्यशास्त्राचे आणि सौंदर्यशस्त्राचे अभिनिवेशी समर्थक आणि जाणते भाष्यकार होते. वकिलाने अशीलाची बाजू जशी मांडावी किंबहुना प्रेयसीने प्रियकराची बाजू जशी पोटतिडकीने मांडावी, तशाच उमाळ्याने तेव्हा ते बोलत. त्यातून त्यांची विद्वत्ताही प्रगटत होती. मर्ढेकरांच्या टिकाकारांना तुच्छ लेखण्याचा आणि त्यांचा जमेल तसा उपहास करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असायचा. त्यासाठी ते तात्त्विक मुद्दे उपस्थित करायचे आणि आमच्यासारखे विद्यार्थी यातूनच समृद्ध व्हायचे. आम्हा विद्यार्थ्यांनाही मर्ढेकरांचे खंदे समर्थक बनविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सरांचे मर्ढेकरांच्या कवितेवर अकृत्रिम प्रेम होते. त्यांना केशवसुत फारसे प्रिय नव्हते. त्यांचे प्रेम पहिल्या परंपरेवर नव्हतेच. दुसरी परंपराच त्यांना अधिक प्रिय होती.
वर्गातही आपली प्रियाप्रियता साकारण्यासाठी लागणारी अमोघ वक्तृत्वाची देणगी आणि संवाद कौशल्य त्यांना लाभले होते. पण विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानदृष्टीचे भय वाटायचे. ती भेदून त्यांच्याजवळ जाण्याइतपत क्षमता असणारे, त्यांच्या अहंकाराच्या झळा सोसून त्यांच्याशी संवाद करू शकणारे विद्यार्थी तेव्हाही कमीच होते. मी संशोधन केले तेव्हा माझे मार्गदर्शक अ. ना. देशपांडे होते. पण म्हणून द.भिं.नी मला कधीच अव्हेरले नाही. एम.ए. झाल्यावर मला कनिष्ठ छात्र संशोधन वृत्ती मिळाली. माझा विषय स्वातंत्र्योत्तर कविता होता. अ.ना. आपल्या वाङ्मयेतिहासाच्या लेखनात इतके बुडाले की, विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना फुरसत मिळत नव्हती. तर दभिंना संवादाची ओढ होती. त्यांच्या कक्षात संध्याछाया येईपर्यंत आम्ही विविध विषयांवर किती चर्चा केली असेल कोण जाणे.
तेव्हा त्यांना सिगारेटचे जबर व्यसन होते. अॅश ट्रेमध्ये सिगारेटची थोटके जमा व्हायची. पाकिटातल्या सिगारेटीही संपून गेलेल्या असायच्या. ते किंचित अस्वस्थ व्हायचे आणि मग त्या थोटकांपैकीच एखादे ओठात धरीत.
मला ते थोडे चमत्कारिक वाटायचे पण ते थोटूक पेटवून धूर सोडायचा आणि अखंड चर्चा करायची, हाच त्याचा स्वभाव होता.
मर्ढेकर, पु.शी. रेगे, विश्राम बेडेकर, जी.ए. कुलकर्णी ही त्यांची ध्यासस्थाने होती. या विषयांना स्पर्श झाला की, त्यांच्या रसवंतीला बहार यायची. किती दुपारवेळा मी त्यांच्या सानिध्यात घालविल्या. त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाचा, रसाळ वाणीचा, श्रोत्यांचे उन्नयन करणाऱ्या मोहमयी वक्तृत्वाचा, अंतर्भेदी समीक्षादृष्टीचा आणि चोखंदळ रसिकतेचा माझ्या मनावर गहिरा भाव उमटला आहे. महाकाव्यासारखा मोठा ग्रंथ असो की, एखादे छोटे टिपण असो, सरांची त्यातील मन:पूर्वकता आणि आस्वादकता लक्षणीयच असे.
विशिष्ट ललितकृतींच्या पूर्वसरींच्या वेधापेक्षा दभिंचा वेध नेहमीच पृथगात्म वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे. विलक्षण बुद्धिमत्ता, चौफेर व्यासंग, प्राचीन व अर्वाचीन वाङ्मयाचे कलाकृतीसापेक्ष व्यापकत्व, दुर्मिळ रसिकता, ललित कृतींविषयी प्रेम हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
मर्ढेकरी सौंदर्यशास्त्राच्या कडव्या टिकाकारांशी एकाकीपणाने झुंज देऊन त्या सौंदर्यशास्त्राचे पुन:स्थापन करण्याचा नेकीने प्रयत्न करणारे आमचे गुरू, सर्जनशील समीक्षा लेखनाचे कार्य पूर्ण करून आज कायमचे विसावले. त्यांच्या निधनाने एक हक्काचा मार्गदर्शक हरविल्याचे दु:ख फार मोठे आहे. त्यांना माझे विनम्र अभिवादन.
(लेखक हे ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक आहेत)