अंधश्रद्धेचे दुकान चालविणारे शासनकर्ते झाले

By Admin | Updated: March 21, 2017 02:11 IST2017-03-21T02:11:13+5:302017-03-21T02:11:13+5:30

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्यांवर मात करण्यासाठी देशात अंधश्रद्धा संवर्धन समित्या आणि बुद्धिवाद निर्मूलन समित्या स्थापन झाल्या आहेत.

The superstition shop run rulers | अंधश्रद्धेचे दुकान चालविणारे शासनकर्ते झाले

अंधश्रद्धेचे दुकान चालविणारे शासनकर्ते झाले

यशवंत मनोहर : मअंनिसच्या तिसऱ्या खंडाच्या पुस्तकांचे प्रकाशन
नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्यांवर मात करण्यासाठी देशात अंधश्रद्धा संवर्धन समित्या आणि बुद्धिवाद निर्मूलन समित्या स्थापन झाल्या आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे व त्यावर दुकान चालविणारे शासनकर्ते होत आहेत. साक्षात लोकांवर शासन करण्यासाठी अंधश्रद्धेची नेमणूक केली जात आहे. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अतिशय कठीण झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या मासिकातील निवडक लेखांचा संग्रह असलेल्या ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन’ या तिसऱ्या खंडाच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोमवारी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना डॉ. मनोहर यांनी वर्तमान परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यावर विचार व्यक्त केले. आज अध्यात्माच्या नावावर समाजासमोर मोठा धोका निर्माण केला जात आहे. ईश्वर ही रूढी आहे, ते वास्तव नाही. ही रूढी माणसाने निर्माण केली. मात्र ही रूढी इतकी लोकप्रिय झाली की आज माणूस ती सोडायला तयार नाही. या देशातील लोकांचे मन धार्मिक, आध्यात्मिक, परंपरा, संप्रदायवादी व मूलतत्त्ववादी आहे. लोकांना यातच गुरफटून ठेवण्यासाठी आणि माणूस होण्याचा मार्ग रोखणारी आयुधे निर्माण केली गेली आहेत. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक जोखिमीचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)

कुलगुरूंनी विदर्भाची सांस्कृतिक परंपरा तोडली
विद्यापीठ, शिक्षण संस्था, शाळा-महाविद्यालये ही शिक्षणासोबत नवनिर्मितीचा विचार पेरण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केंद्रे असतात. विचार स्वातंत्र्य आणि विचारांचा आदर करण्याची विदर्भाची परंपरा आहे. वैचारिक भेदभाव ही नागपूर विद्यापीठाची परंपरा नाही. मात्र सीताराम येचुरींचा कार्यक्रम रद्द करून नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विदर्भाची ही सांस्कृतिक परंपरा मोडून नवी अंधश्रद्धा निर्माण केल्याची घणाघाती टीका डॉ. श्रीपाद जोशी यांनी यावेळी केली. अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि नवभारत निर्मितीचा विचार विद्यापीठातून, शाळा-महाविद्यालयामधून घरोघरी पोहचणे आवश्यक आहे. मात्र कोणत्या कुलगुरूंच्या भरवशावर हे कार्य करावे, हा प्रश्न आहे. विद्यापीठात विचार मांडायचा नाही तर कुलगुरूंच्या घरी विचार मांडायचा काय, असा उपरोधिक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

देशापुढे मूलतत्त्ववादाचा मोठा धोका
यावेळी उपस्थित अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनीही वर्तमान परिस्थिती व राजकीय घटनाक्रमावर कडाडून टीका केली. आजचे नवतंत्रज्ञानाचे माध्यम परिवर्तनासाठी उपयोगी पडेल, ही आशा फोल ठरली आहे. भारतीय राज्यघटना ही अंधश्रद्धा निर्मूलनाचा व शास्त्रीय समाज निर्माण करण्याचा जाहीरनामा आहे. असे दस्तावेज जगात कुठेही सापडणार नाही. मात्र या राज्यघटनेला अपेक्षित शास्त्रीय समाज निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या लोकशाहीच्या सभागृहात अतिशय अशास्त्रीय लोक पोहोचले आहेत. लोकतांत्रिक अधिकारामधून अशी अव्यवहारिक व्यवस्था आकार घेत आहे आणि हा समाज, राजसत्ता, प्रसार माध्यमे व या सर्वांना भांडवल पुरविणारे उद्योजक नवतंत्रज्ञानाच्या मदतीने हे सर्व घडवून आणत आहेत. देशापुढे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीपुढे सर्वात मोठा धोका निर्माण झाल्याची टीका डॉ. जोशी यांनी यावेळी केली. संविधान हे नवभारत निर्मितीचे दस्तावेज आहे. मात्र हा जाहीरनामा नाहीसा करण्यासाठी प्रचंड प्रयत्न होत आहेत.यासाठी राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक शक्ती प्रचंड वेगाने सक्रिय झाली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे या विषमतावादी परिस्थितीचे बळी ठरले असल्याचे मनोगत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी समितीच्या भविष्यातील वाटचालीचे विवरण करीत अंनिसची चळवळ अधिक वेगाने गतिमान करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या वेळी विजय सालंकर, महादेव भुईभार, अनिसचे जिल्हाध्यक्ष संजय शेंडे, गजेंद्र सुरकार, ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ वैज्ञानिक प्रभाकर नानावटी यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संपादक राहुल थोरात यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रिता धांडेकर यांनी केले. कार्यक्रमात मधुकर धंद्रे, सुनील भगत, जयेंद्र पेंडसे, प्रा. सुशील मेश्राम, स्वप्नील हुमणे आदींचा सहभाग होता.

Web Title: The superstition shop run rulers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.