उपराजधानीचे आरोग्य बिघडले!
By Admin | Updated: May 27, 2015 02:48 IST2015-05-27T02:48:34+5:302015-05-27T02:48:34+5:30
मागील काही वर्षांपासून उपराजधानीत विकासाच्या नावाखाली मोठमोठी झाडे तोडून सिमेंट कॉक्रिटचे जंगल तयार केले जात आहे.

उपराजधानीचे आरोग्य बिघडले!
तापमानात वाढ : प्रदूषण रोखण्याची गरज
जीवन रामावत नागपूर
मागील काही वर्षांपासून उपराजधानीत विकासाच्या नावाखाली मोठमोठी झाडे तोडून सिमेंट कॉक्रिटचे जंगल तयार केले जात आहे. तसेच चोहोबाजूंनी कारखाने उभे राहत आहे. वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामत: शहरातील प्रदूषण वाढले असून, आरोग्य बिघडले आहे.
गत काही वर्षांत येथील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. तापमान वाढले आहे. पूर्वी तापमान ४७ अंशावर पोहोचले, तरी सायंकाळ होताच वातावरण थंड होत होते. त्यात एक प्रकारचा गारवा अनुभवला जात होता. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण घराच्या गच्चीवर झोपत होते. परंतु अलीकडे दिवसाच्या वाढत्या तापमानासोबतच रात्रीसुद्धा उकाडा होतआहे. त्यामुळे गच्चीवर झोपणे कायमचे बंद झाले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, नागपूर बंगालचा उपसागर आणि अरेबियन समुद्रापासून दूर असलेल्या भारतीय व्दीपकल्पाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे येथील हवामान आर्द्र आणि कोरडे आहे. येथे वर्षातील बहुतांश काळ कोरडेच हवामान असते. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात नागपुरात १२०५ मिमी इतका पाऊस पडतो. यापूर्वी १४ जुलै १९९४ रोजी नागपुरात एकाच दिवशी ३०४ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.