‘सुपर स्पेशालिटी’ बॅ.अंतुलेंची देण
By Admin | Updated: December 3, 2014 00:40 IST2014-12-03T00:40:52+5:302014-12-03T00:40:52+5:30
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले विदर्भासाठी विशेष पॅकेज जाहीर करीत होते. त्याच वेळी त्यांच्यापुढे नागपूरमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज असे इस्पितळ असावे,

‘सुपर स्पेशालिटी’ बॅ.अंतुलेंची देण
विदर्भावर होते विशेष प्रेम: काँग्रेस नेत्यांनी दिला आठवणींना उजाळा
नागपूर: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले विदर्भासाठी विशेष पॅकेज जाहीर करीत होते. त्याच वेळी त्यांच्यापुढे नागपूरमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज असे इस्पितळ असावे, अशी मागणी करणारी एक चिठ्ठी गेली आणि अंतुले यांनी त्याच क्षणी नागपुरात सुपर स्पेशालिटी इस्पितळाची घोषणा केली.
अंतुलेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम केलेले काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी व त्यावेळी रामटेकचे आमदार म्हणून सभागृहात उपस्थित असलेले अॅड. मधुकर किंमतकर यांनी ही आठवण सांगितली. अंतुले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेची तसेच नागपूरसह विदर्भाविषयी असलेल्या आस्थेची आवर्जून आठवण केली.
मुख्यमंत्री म्हणून अंतुले यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा नागपूरसह विदर्भाला लाभ झाला. गडचिरोली जिल्ह्याची अनेक वर्षांपासूनची मागणी त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाली. १९८० मध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन होते .शेतकऱ्यांच्या अडचणीचा मुद्दा ऐरणीवर होता. याच अधिवेशनात अंतुले यांनी एका झटक्यात कर्जमाफीची घोषणा केली होती. विदर्भ विकासाचा कार्यक्रम तयार झाला होता. सभागृहात मुख्यमंत्री तो जाहीर करीत असतानाअॅड. मधुकर किंमतकर यांनी नागपूरमध्ये सुसज्ज इस्पितळ असावे, अशी सूचना त्यावेळी आरोग्य राज्यमंत्री असलेले सतीश चतुर्वेदी यांच्याकडे केली. एका साध्या कागदावर ही सूचना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचविली. त्या आधारावच अंतुले यांनी नागपुरात सुपर स्पेशालिटी सुरू करण्याची घोषणा केली. नंतर याचा समावेश विदर्भ विकास कार्यक्रमात करण्यात आला होता, अशी आठवण या नेत्यांनी सांगितली. (प्रतिनिधी)
झटपट निर्णय घेणारा नेता
मी राज्यमंत्री असूनही विदर्भातून आलेलो असल्याने या भागातील निर्णय घेताना ते विश्वासात घेत असत. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच नागपूरमध्ये आले असताना त्यांनी रामगिरीवर आम्हाला ब्लॉक पातळीवर तालुक्याची निर्मिती करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करायला सांगितले.त्यांनी त्याला मान्यताही दिली. त्यावेळी ३० ते ४० नवीन तालुके निर्माण झाले होते. विदर्भ दौऱ्यावर असतानाच तालुक्याच्या ठिकाणी हुतात्मा स्मारक असावे, अशी कल्पना सूचली व तत्काळ त्यांनी त्यांची अंमलबजावणीही केली. विदर्भात आठ नवीन आयटीआय सुरू केले. झटपट निर्णय घेणारे ते नेते होते.
सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री व काँग्रेस नेते.
विदर्भाविषयी आस्था
एक अभ्यासू मुख्यमंत्री होते. त्यांना विदर्भाविषयी आस्था होती. अनुशेषाचा मुद्दा पोटतिडकीने मांडत असल्याने ते नेहमीच माझे कौतुक करायचे. नागपूर, विदर्भाच्या संदर्भातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. एक कर्तृत्ववान नेतृत्व त्यांच्या निधनाने हरपले आहे.
अॅड. मधुकर किंमतकर, माजी मंत्री