परिचारिकांच्या भरवशावर सुपरची रुग्णसेवा
By Admin | Updated: December 6, 2015 03:18 IST2015-12-06T03:18:51+5:302015-12-06T03:18:51+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

परिचारिकांच्या भरवशावर सुपरची रुग्णसेवा
१७ वर्षांपासून निवासी डॉक्टरांची पदेच नाहीत : रुग्णालयाला ८६ डॉक्टरांची प्रतीक्षा
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु येथे १७ वर्षांपासून रुग्णालयाचा कणा असलेले निवासी डॉक्टरांची पदेच मंजूर नाहीत. हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर निघून गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी परिचारिकांवर येते. सुटीच्या दिवशी, रात्रीच्यावेळी रुग्ण अडचणीत येतात. असे असतानाही प्रशासन डॉक्टरांच्या पद भरतीकडे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २०१२ मध्ये डी.एम.कार्डिओलॉजी व डी.एम.गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी हे अभ्यासक्रम नव्याने सुरू झाले. तसेच विविध विषयांमध्ये डी.एम. व एम.सीएच हे अभ्यासक्रम सुरू करावयाचे असल्याने कनिष्ठ निवासी डॉक्टरांची ३९ तर वरिष्ठ निवासी डॉक्टरांची ४७ अशा एकूण ८६ पदांचा प्रस्ताव २०१२ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला पाठविण्यात आला. परंतु अद्यापही या पदांना मंजुरी मिळालेली नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ १९९८साली तयार झाले. सध्याच्या स्थितीत हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी या सात विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. गेल्या दोन वर्षात २५ हजार ९७६ रुग्णाची वाढ झाली आहे. तसेच आंतररुग्णांतही वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५ हजार ५१२ रुग्ण भरती होते. गेल्या वर्षी १ हजार ५५१ रुग्णांची वाढ होऊन ही संख्या ७ हजार ६३वर गेली आहे. रुग्णालयात रोज १५ वर अॅन्जिओग्राफी, पाचवर अॅन्जिओप्लास्टी, दोन हृदयशल्यक्रियासह दोन न्युरो सर्जरी होतात. या शिवाय बहुसंख्य वॉर्डाच्या खाटा गंभीर रुग्णाने फुल्ल असतात. यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी २४ तास डॉक्टरांची गरज असते. परंतु सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेनंतर डॉक्टरच राहत नसल्याने अनेकवेळा रुग्णाच्या जीवावर बेतते. अशी बिकट स्थिती असतानाही शासनाचे याकडे लक्ष नाही. धक्कादायक म्हणजे, गेल्या महिन्यात साप चावलेल्या एक ३५ वर्षीय महिलेला सुपरमध्ये हिमोडायलिसीस करायचे होते. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरच नसल्याने त्या महिलेवर वेळेवर हिमोडायलिसीस होऊच शकले नाही. परिणामी त्या महिलेचा मृत्यू झाला. यापूर्वी अशा घटना झाल्याचे सांगण्यात येते.(प्रतिनिधी)