सुपारीचा जीवघेणा धंदा

By Admin | Updated: December 14, 2015 02:56 IST2015-12-14T02:56:56+5:302015-12-14T02:56:56+5:30

आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक असलेल्या सुपारीची उपराजधानीत बिनबोभाट विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.

Supari's life-threatening business | सुपारीचा जीवघेणा धंदा

सुपारीचा जीवघेणा धंदा

बिनबोभाट विक्री : उपराजधानीत मोठे नेटवर्क
नरेश डोंगरे नागपूर
आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक असलेल्या सुपारीची उपराजधानीत बिनबोभाट विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. कॅन्सरसारख्या रोगाची भेट देणाऱ्या या सुपारीच्या विक्रीतून काही गल्लाभरू विक्रेते रोज करोडोंची उलाढाल करीत असून, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा गोरखधंदा आता उपराजधानीत चांगलाच फळला-फुलला आहे.
जगाच्या पाठीवर भारतासह अनेक देशात सुपारीचे उत्पादन होते. त्यापैकी इंडोनेशियात निकृष्ट दर्जाची सुपारी ‘स्क्रॅप’ म्हणून डम्पिंग यार्डमध्ये फेकली जाते. ही सुपारी जशीच्या तशी उचलून भारतात आणली जाते. धुवून, पुसून ती विविध प्रांताप्रमाणेच महाराष्ट्रातही आणली जाते. चांगल्या सुपारीत या सडक्या सुपारीचे मिश्रण करून ती विकली जाते. नागपूर, विदर्भात ही सडलेली आणि आरोग्याला अपायकारक असलेली सुपारी बिनबोभाट विकली जाते. कारण येथे खर्ऱ्याला जबरदस्त मागणी आहे. मोठ्या चौकातील एक पानटपरीवाला दिवसभरात खर्ऱ्याच्या १०० ते ३०० पुड्या विकतो. खर्ऱ्यात या सुपारीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने या सुपारीची विदर्भात मोठ्या प्रमाणात विक्री होते.

बनावट सुगंधित सुपारी
नागपूर :सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून बनावट सुगंधित सुपारी तयार केली जाते. ती रजनीगंधा, पानबहार, पानपराग या सारख्या नावाजलेल्या सुगंधित सुपारीच्या बनावट डब्यात किंवा पाऊचमध्ये घालून त्याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. ‘मिठी‘ सुपारीच्या नावाखाली लहान मुलांनाही ती विकली जाते. या गोरखधंद्यातून गल्लाभरू विक्रेते महिन्याला कोट्यवधी रुपये कमवितात. दुसरीकडे हजारो जणांना कॅन्सरच्या जबड्यात ढकलतात. विशेष म्हणजे, खाणाऱ्याला त्याचे भयावह परिणाम ‘कॅन्सर डिटेक्ट’ झाल्यानंतरच कळतात. अनेकांना या सुपारीपासून बनविलेल्या खर्रा किंवा सुगंधित पानमसाल्यामुळे ‘लॉक जा’ (पुरेसे तोंड न उघडणे) सारख गंभीर आजार जडतात. तहान,भुकेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो.
नेटवर्कला चिंटूचा आधार
सूत्रांच्या माहितीनुसार, या जीवघेण्या सुपारीच्या धंद्यात इतवारी, वर्धमाननगरातील काही जण सक्रिय आहेत. रोज १०० पेक्षा जास्त सुपारीचे ट्रक ते आणतात. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे हे समाजकंटक सडक्या सुपारीची शेकडो पोती रातोरात विकतात. विशेष म्हणजे, ही सडकी सुपारी विकणारांचे उपराजधानीतील नेटवर्क लकडगंज, कळमन्यातून चालविले जाते. या नेटवर्कसाठी कुख्यात चिंटू काम करतो. अनेकांशी त्याची भागीदारी असल्याचीही चर्चा आहे. कारवाई करण्यासाठी धावलेले संबंधित विभागाचे अधिकारी चिंटू मॅनेज करतो. त्याच्यामुळे धरमपेठ आणि प्रतापनगरसह अन्य भागातही हा गोरखधंदा आता पाय पसरत असल्याचे समजते. या जीवघेण्या सुपारीच्या धंत्यात गुंतलेल्या २०० जणांकडून ‘महाराज‘ नामक गुंड महिन्याला प्रत्येकी २ हजार ( एकूण ४ लाख) रुपये खंडणी वसूल करतो. विविध नेत्यांशी सलगी साधून तो आपला गोरखधंदा चालवतो, अशीही चर्चा आहे. त्याच्या आश्रयानेच ‘कॅन्सर‘विक्रीचा हा धंदा बिनधास्त सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Supari's life-threatening business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.