सुनीलला हवाय मदतीचा हात
By Admin | Updated: June 17, 2014 00:48 IST2014-06-17T00:48:56+5:302014-06-17T00:48:56+5:30
बालपणीच त्याने पोलीस बनण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी त्याची तयारीही सुरूच होती. ६ जूनला एसआरपीएफची भरती हिंगण्यात होती. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत,

सुनीलला हवाय मदतीचा हात
पोलीस भरती जीवावर बेतली : आॅरेंज सिटीत उपचार सुरू
नागपूर : बालपणीच त्याने पोलीस बनण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी त्याची तयारीही सुरूच होती. ६ जूनला एसआरपीएफची भरती हिंगण्यात होती. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत, त्यातच कुटुंबाचा भार, मोठी उमेद घेऊन तो भरती प्रक्रियेत सहभागी झाला. आणि धावण्याच्या परीक्षेत अचानक भोवळ येऊन पडला. लागलीच त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर लिव्हर, किडनी निकामी झाल्याचे सांगितले. त्याच्या उपचारावर चार लाखाचा खर्च होणार असल्याचे सांगितल्याने, कुटुंबीयांचे हातपायच गळाले. घरची शेती गहाण ठेवून आलेल्या पैशातून त्याच्यावर आॅरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या पीडित तरुणाचे नाव आहे, सुनील येळे. सांगली जिल्ह्यातील घाणंद तालुक्याच्या आटपाडी गावच्या सुनीलची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. वडिलांचा आधार हरविला आहे. तीन भाऊ असून मोठा मजुरी करून कुटुंबाला हातभार लावतो आहे. मधला सुनील टेलरींग करून पोटापाण्याची गरज भागवितो. त्याचे लग्न होऊन अवघे सहा महिने झाले आहे. कसेबसे त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
पोलीस बनल्यावर दिवस पालटतील, या अपेक्षेने त्याचे प्रयत्न सुरू होते. तीन ते चार वेळा पोलीस भरतीमध्ये सहभागीही झाला. मात्र अपयश आले. नागपुरात हिगणा येथे एसआरपीएफची भरती असल्याचे सुनीलला समजले. ५ जुनला तो सांगलीहून नागपूरकडे निघाला. रात्रभराचा प्रवास करून हिंगण्यात पोहचला. भरतीत सहभागी झाला. १०० मीटर धावणी, लांब उडीत गुणवत्ता मिळविली. मात्र पाच किलोमीटरची धावणी परीक्षा त्याच्यावर चांगलीच बेतली. एक किलोमीटरचा एक राऊंड त्याने पूर्ण केला. आणि अचानकच भोवळ येऊन तो पडला. लगेच पोलिसांनी त्याला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला आॅरेंज सिटी रुग्णालयात हलविण्यात आले.
धावताना त्याला रक्ताची उलटी आली. मात्र ती बाहेर न पडता श्वासनलिकेत गेली, तो कोमात गेला. सध्या सुनील शुद्धीवर आला आहे. परंतु अजूनही त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्याच्यावर दररोज डायलिसीस करण्यात येते. यासाठी दररोज २५ हजार रुपये लागत आहे. भावाजवळचे पैसे संपले आहे. १.२० लाख रुपये दवाखान्याचे बिल थकले आहे. पैसे नसल्यामुळे डॉक्टरांनी उपचार थांबविला आहे. (प्रतिनिधी)
दान दात्यांकडून हवाय मदतीचा हात
-एसआरपीएफच्या कमांडंटनी पुढाकार घेऊन, थोडीफार मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आर. आर. पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही यश आलेले नाही. शेती गहाण ठेवून होते तेवढे दिले, आता पैसेच नसल्याने भाऊ हतबल, लाचार झाला आहे. अशावेळी त्याला समाजातील दात्यांची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांनी सुनीलला मदत करायची असेल, बँक आॅफ इंडियाच्या १६०२१०११००००६२७ या खाते क्रमांकावर मदत पाठवू शकतात. अथवा ९९२११६३२६४ व ८२७५२६६५१२ या क्रमांकावर संपर्क करू शकता.