रविवारीही नोटवारी !

By Admin | Updated: November 14, 2016 02:35 IST2016-11-14T02:35:06+5:302016-11-14T02:35:06+5:30

मागील चार दिवसांपासून जुन्या ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा बदलवून नवीन नोटा मिळविण्यासाठी नागरिक बँकेत चकरा मारत आहे.

Sunday, too! | रविवारीही नोटवारी !

रविवारीही नोटवारी !

बँकातील रांगा संपेना एटीएमध्ये पैसे मिळेनात नोटा बदलविण्यासाठी कुटुंब रांगेत
नागपूर : मागील चार दिवसांपासून जुन्या ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा बदलवून नवीन नोटा मिळविण्यासाठी नागरिक बँकेत चकरा मारत आहे. रविवारचा सुटीचा दिवस सुद्धा नागरिकांच्या नोटा बदलवण्यासाठी बँकेच्या रांगेतच गेला. अनेक ठिकाणी तर नागरिक पत्नी आणि मुलाबाळासोबतच रांगेत लागले होेते. सोमवारी गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने रविवारी एटीएमवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. परंतु मोजके एटीएम सोडले तर बहुतांश एटीएमचे शटर उघडलेच गेले नव्हते. त्यामुळे एटीएमच्या शोधात नागरिक भटकत राहिले.
रविवार सुटीचा दिवस होता. प्रशासनाने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुटीच्या दिवशी सुद्धा बँका सुरू ठेवल्या होत्या. त्यामुळे ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना कामामुळे वेळ मिळाला नाही, त्यांनी रविवारची सुटी बँकेत रांगेत लावूनच घालवली. सीताबर्डी, धंतोली, मुंजे चौक, सिव्हील लाईन्स, सेंट्रल एव्हेन्यू, वैशालीनगर, मानेवाडा रोड, पाचपावली, कॉटन मार्केट, रेल्वे स्टेशन चौक, अयोध्यानगर आदींसह विविध ठिकाणी सारखेच चित्र होते. बँकेत नोटा बदलवण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या बाहेर रस्त्यांपर्यंत रांगा होता. एटीएमवर रांगा होत्या. काही एटीएमचे शटर अर्धे उघडे होते. त्यामुळे ते उघडतील या आशेने लोक अशा एटीएमसमोरही वाट पाहत उभे असल्याचे दिसून आले. एकूणच आधीच नोटांअभावी त्रस्त असलेल्या नागरिकांचा संताप आणि उद्रेक रविवारी दिसून येत होता.

इतर बँकेच्या ग्राहकांना एटीएममध्ये नो एन्ट्री
सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काही बँकेने आपल्या एटीएममधून नोटा काढण्यासाठी आपल्याच ग्राहकांना प्राधान्य दिले. सिव्हील लाईन्स बोर्ड आॅफिससमोर एका बँकेचे एटीएम मशीन आहे. या ठिकाणी पाच मशीन आहेत. परंतु त्या मशीनचा वापर करण्यासाठी केवळ संबंधित बँकेच्या ग्राहकालाच प्रवेश दिला जात होता. बाहेर उभा असलेला गार्ड प्रत्येक व्यक्तीचे एटीएम कार्ड तपासून आत सोडत होता. इतर बँकेचे ग्राहक असल्यास त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. लोक वाद घालीत तेव्हा मशीनमध्ये इतर कार्ड चालत नसल्याचे गार्डकडून सांगण्यात येत होते. काही एटीएम मशीनमध्ये इतर बँकेचे कार्ड ब्लॉक करण्यात आले होते.

पोलीस अधिकाऱ्यांशी वाद
सेंट्रल एव्हेन्यू स्थित एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमसमोर नागरिक रांगेत उभे होते. सकाळपासून नागरिक रांगेत लागले होते. तरीही एटीएम सुरू होत नसल्याने ओरड वाढली. गोंधळ होत असल्याचे पाहून एका पोलीस अधिकाऱ्याने शांत राहण्यास सांगितले. यावर एक तरुण वाद घालू लागला. यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

२० रुपयाची नकली नोट
किंग्जवे रोड स्थित एका बँकेत नोटा बदलवण्यासाठी आॅटोने एक तरुण आला. ३० रुपये आॅटोचे भाडे झाले. तरुणाने चालकाला ५० रुपये दिले. आॅटो चालकाने २० रुपयाची नोट फोल्ड करून परत केली. तरुणाने ती नोट आपल्या शिखात ठेवली. थोड्याच वेळात तरुणाला काही शंका आली. त्याने ती नोट काढून पाहिली असता त्यावर भारतीय मनोरंजन बँक असे लिहिले होते. ती नकली नोट होती. परंतु तेव्हापर्यंत आॅटोचालक निघून गेला होता.

Web Title: Sunday, too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.