रविवार ‘थंडी’ वार
By Admin | Updated: December 7, 2015 06:32 IST2015-12-07T06:32:41+5:302015-12-07T06:32:41+5:30
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासोबतच थंडीने उपराजधानीत धडक दिली आहे. मागील ४८ तासात शहरातील

रविवार ‘थंडी’ वार
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासोबतच थंडीने उपराजधानीत धडक दिली आहे. मागील ४८ तासात शहरातील तापमान ७.१ अंश सेल्सिअसने खाली घसरू न ११.३ अंशापर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे रविवार हा आतापर्यंतचा सर्वांत थंड दिवस राहिला आहे. प्रथमच डिसेंबर महिन्यात तापमान सामन्यापेक्षा खाली घसरले आहे. विदर्भातील वातावरणात थंड वारे वाहू लागले असून, मध्यभारतातील तापमान सतत खाली घसरत आहे. त्यामुळे पुढील २४ तासात नागपूरसह विदर्भातील तापमान पुन्हा १ ते २ अंशांनी खाली घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या विदर्भातील सर्व जिल्ह्यात कमाल तापमान ३० डिग्रीपेक्षा अधिक तर किमान तापमान १४ ते १५ डिग्रीपर्यंत आहे. उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम हळूहळू विदर्भातही जाणवू लागला आहे. रविवारी शेजारच्या मध्यप्रदेशातील रिवा व रायसेन शहरात किमान ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात अचानक घट झाली आहे.
त्यामुळे पुढील आठवडाभरात नागपुरातील पारा १० अंशापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २९ डिसेंबर २०१४ या दिवशी सर्वांधिक थंडी पडली होती. या दिवशी पारा हा ५ डिग्रीपर्यंत खाली घसरला होता.(प्रतिनिधी)