सूर, ताल, लयचा अनोखा संगम आज

By Admin | Updated: March 22, 2015 02:23 IST2015-03-22T02:23:03+5:302015-03-22T02:23:03+5:30

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त ...

Sun, rhythm, lye, unique confluence today | सूर, ताल, लयचा अनोखा संगम आज

सूर, ताल, लयचा अनोखा संगम आज

नागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त आज रविवारी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार चिटणीस पार्क, महाल येथे सेलिब्रिटी गायक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हरिहरन यांचा कार्यक्रम आणि चित्रपट अभिनेते जॉन अब्राहम यांच्या विशेष उपस्थितीने सूर, ताल आणि लयचा अनोखा संगम नागपूरकर रसिकांना अनुभवता येईल. हा कार्यक्रम सायंकाळी ५. ३० वाजता होईल. या कार्यक्रमात हरिहरन आणि त्यांच्या सोल इंडिया बँडचे कलावंत गझल आणि गीतांच्या सादरीकरणाने ही सायंकाळ अविस्मरणीय करणार आहेत. त्यात चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम तरुणाईशी खास संवाद साधणार असल्याने त्याचे आकर्षण आहे. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाचे सन्मानचिन्ह राहणार आकर्षक
यंदा सूर ज्योत्स्ना पुरस्कारासाठी तयार करण्यात आलेले सन्मानचिन्ह खास आकर्षक करण्यात आले आहे. यात शंख आणि ग्रामोफोनची आकृती असणार आहे. भारतीय संस्कृतीत शंखनादाला विशेष महत्त्व आहे. या सन्मानचिन्हाची निर्मिती बडोद्याचे शिल्पकार संदीप पिसाळकर यांनी केली आहे. या समारंभात श्रीमती ज्योत्स्ना दर्डाद्वारा लिखित ‘महावीर नमन’ या भजनांच्या अल्बमचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या अल्बममध्ये गायिका साधना सरगम, वैशाली सामंत, गायक सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि रुची कलंत्री यांच्या आवाजातील भजने असणार आहेत. कॉपीराईट कायद्यांतर्गत अल्बमचे सर्वाधिकार टाइम्स म्युझिक कंपनीला प्रदान करण्यात आले आहेत.
प्रवेशपत्राचे वितरण सुरू
लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच व कॅम्पस क्लबच्या सदस्यांना त्यांचे ओळखपत्र दाखविल्यावर चार व्यक्तींना थेट प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय लोकमतच्या वाचकांनी संबंधित जाहिरातीचे कात्रण लोकमत कार्यालयात दाखविल्यास त्यांना दोन व्यक्तींसाठी प्रवेशपत्र देण्यात येईल. यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत संपर्क करावा. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, रामदासपेठ येथे दूरध्वनी क्रमांक २४२९३५५ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Sun, rhythm, lye, unique confluence today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.