सन अँड सँडचे व्यवस्थापन ला मेरिडियनकडे
By Admin | Updated: June 25, 2015 03:07 IST2015-06-25T03:07:34+5:302015-06-25T03:07:34+5:30
जगभर ला मेरिडियन या नावाने पंचतारांकित हॉटेल्स चालविणाऱ्या अमेरिकेतील स्टारवूड हॉटेल्स व रेझॉर्टस् या कंपनीने नागपूरच्या सन अँड सँड या हॉटेलचे दैनंदिन व्यवस्थापनाचा ताबा घेतला आहे.

सन अँड सँडचे व्यवस्थापन ला मेरिडियनकडे
सप्टेंबरमध्ये नावही बदलणार
सोपान पांढरीपांडे नागपूर
जगभर ला मेरिडियन या नावाने पंचतारांकित हॉटेल्स चालविणाऱ्या अमेरिकेतील स्टारवूड हॉटेल्स व रेझॉर्टस् या कंपनीने नागपूरच्या सन अँड सँड या हॉटेलचे दैनंदिन व्यवस्थापनाचा ताबा घेतला आहे.
या वार्तेची पुष्टी सन अँड सँडचे नवे महाव्यवस्थापक शिव बोस यांनी आज लोकमतशी बोलताना केली. सन अँड सँड हॉटेल हे पुण्याच्या क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंटस् प्रा. लि. कंपनीच्या मालकीचे आहे. कंपनी मुंबई, पुणे, शिर्डी आणि नागपूर अशा चार पंचतारांकित हॉटेल्सचे संचालन करते. यापैकी फक्त नागपूरच्या सन अँड सँडचे व्यवस्थापन ला मेरिडियन करणार आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये करारानुसार हॉटेलचे नावही ला मेरिडियन होणार असल्याची माहितीही बोस यांनी दिली.
भारतातले पहिले सन अँड सँड हॉटेल विख्यात सिंधी व्यावसायिक गुल अडवाणी यांनी १९६२ साली मुंबईतील जुहू बीचवर उभारले. तेव्हा हे मुंबईतील पहिले पंचतारांकित हॉटेल होते. १९९६ साली पुण्यातील बांधकाम व्यवसायी अविनाश भोसले या हॉटेलचे भागीदार झाले व त्यांनी अडवाणींसोबत क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंटस् कंपनी स्थापन केली. या कंपनीने नंतर पुण्यातील हॉलिडे इन हॉटेल विकत घेऊन त्याचे नामकरण सन अँड सँड असे केले व शिर्डीला एक नवे हॉटेल सुरू केले. नागपुरातील सन अँड सँड २०१० ला सुरू झाले. पण हा उपक्रम कधीच नीट चालला नाही, त्यामुळे अडवाणी व भोसले यांनी व्यवस्थापन ला मेरिडियनकडे सोपविल्याची चर्चा नागपुरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये आहे.