मनपा व पोलीस आयुक्तांना समन्स
By Admin | Updated: December 4, 2015 03:24 IST2015-12-04T03:24:13+5:302015-12-04T03:24:13+5:30
मनाई आदेश असतानाही रोडवर मंडप उभारणे सुरूच असल्याची बाब गंभीरतेने घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

मनपा व पोलीस आयुक्तांना समन्स
हायकोर्ट : मनाई आदेश असतानाही रोडवर मंडप
नागपूर : मनाई आदेश असतानाही रोडवर मंडप उभारणे सुरूच असल्याची बाब गंभीरतेने घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिका आयुक्त श्रवण हर्डीकर व पोलीस आयुक्त एस. पी. यादव यांना समन्स बजावला. दोन्ही अधिकाऱ्यांना १० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
रोडवरील अतिक्रमणासंदर्भात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. १६ सप्टेंबर २००९ रोजी उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील आदेशात रस्त्यांवर राजकीय, धार्मिक, सामाजिक, क्रीडा इत्यादी कोणत्याही प्रकारच्या तात्पुरत्या व पक्क्या बांधकामाला परवानगी देऊ नका, असे निर्देश दिले आहेत. परंतु मनपा व पोलीस विभाग आदेशाचे काटेकोर पालन करण्यात अपयशी ठरत आहे. गेल्या काही महिन्यांत विविध कार्यक्रमानिमित्त अनेकदा रोडवर मंडप उभारण्यात आलेत. याविषयी वृत्तपत्रांत बातम्या प्रकाशित झाल्या. न्यायालयाने याची दखल घेऊन दोन्ही अधिकाऱ्यांना समन्स बजावला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)