सुखविंदरसिंगच्या ‘बिस्मिल बिस्मिल..’ने जिंकले
By Admin | Updated: January 28, 2015 01:05 IST2015-01-28T01:05:04+5:302015-01-28T01:05:04+5:30
प्रेक्षकांची मनसोक्त दाद....खच्चून भरलेले स्टेडियम, प्रसिद्ध पार्श्वगायक सुखविंदरसिंग यांची वाखाणण्यासारखी एनर्जी आणि प्रेक्षकांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात एका सुरेल

सुखविंदरसिंगच्या ‘बिस्मिल बिस्मिल..’ने जिंकले
नागपूर महोत्सवाचा समारोप : पार्श्वगायक सुखविंदसिंगचे सुरेल सादरीकरण
नागपूर : प्रेक्षकांची मनसोक्त दाद....खच्चून भरलेले स्टेडियम, प्रसिद्ध पार्श्वगायक सुखविंदरसिंग यांची वाखाणण्यासारखी एनर्जी आणि प्रेक्षकांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात एका सुरेल मैफिलीने नागपूर महोत्सवाची सांगता करण्यात आली. या महोत्सवाला महानगरपालिकेतर्फे २२ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला. सुखविंदरसिंग यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत आणि आतापर्यंत अनेक चित्रपटातून त्यांची गीते लोकप्रियही झाली आहेत. त्यामुळेच सुखविंदरसिंग याचा ‘जय हो...’ कार्यक्रम ऐकण्यासाठी नागपूरकरांमध्ये कुतूहल होते. त्याचा प्रत्ययही या कार्यक्रमात आला.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात शहरातील रंगरसिया नाट्यसंस्थेच्यावतीने पथनाट्य सादर करण्यात आले. भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘पाईप बँड डेमॉन्स्ट्रेशन’ सादर केले. त्यानंतर मात्र प्रेक्षकांनी सुखविंदरसिंगच्या नावाचा जयघोषच सुरू केला आणि प्रेक्षकांना प्रतिसाद देत सुखविंदरसिंगने रंगमंचावर प्रवेश केला. त्याने आपल्या गायनाचा प्रारंभ गणेश वंदनेने केला आणि त्यानंतर एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपट गीतांनी त्याने रसिकांना जिंकले. याप्रसंगी सुखविंदर यांनी ‘मरजानी मरजानी..., छैय्या छैय्या..., होले होले हो जाएगा प्यार सजना...’ आदी गीतांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करीत त्यांना थिरकायला भाग पाडले.
याप्रसंगी स्टेडियममध्ये अनेक प्रेक्षक त्याच्या गीतावर ताल धरीत नाचत होते. याप्रसंगी नागपूरकर गायंकांनीही ‘हम तेरे बिन अब रह नही पाते..., तेरी दिवानी..., मुस्कुराने की वजह तुम हो..., बचना ए हसिनो..., आज की रात होना है क्या...’ आदी गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.
जरा वेळ विश्रांती घेतल्यावर सुखविंदरसिंग रंगमंचावर आला आणि त्याने तुफान नृत्य करीत नागपूरकर रसिकांना जिंकले. गीत सादर करताना प्रेक्षकांशी संवाद साधण्याची त्याच्या शैलीला प्रेक्षकांनीही दाद दिली. याप्रसंगी त्याने ‘बिस्मिल बिस्मिल..., बिडी जलई ले..., ओमकारा ओमकारा...’ ही ही गीते सादर करताना ‘ऐसा मूड बनाऊंना ना नागपुर वालो’ म्हणत त्याचे स्वत:चे आवडते गाणे ‘नशा ही नशा है...’ सादर केले आणि त्याला ‘वन्स मोअर’ मिळाला़ कार्यक्रमात अनेक लोकप्रिय गीते सादर करताना तो जणू थकतो की नाही, असेच वाटत होते़ कार्यक्रमात अखेरपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करीत त्याने हा कार्यक्रम आठवणीत राहणारा केला. ‘जय हो... आणि चक दे इंडिया़़..’ या गीताने त्याने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
‘चक दे इंडिया...’ गीत सादर करताना त्याने भारत माता की जय ही घोषणा दिली आणि त्याला प्रेक्षकांनीही प्रतिसाद दिला. मनाला आवडते ते सारे करा पण आपल्या देशाशी अप्रामाणिक होऊ नका, असे आवाहन करीत त्याने गायनाचा समारोप केला. हा कार्यक्रम संपू नये असे वाटत असतानाच तो संपला. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. मिलिंद माने, महापौर प्रवीण दटके, प्रमोद भुसारी, प्रफुल्ल फरकसे व महापालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रध्वजाचा अपमान करू नका
सुखविंदर सिंग यांनी अखेरीस ‘चक दे इंडिया...’ हे गीत सादर केले. त्यावेळी त्यांच्यासोबत रंगमंचावर नृत्य करणारे कलावंत तिरंगा हातात घेऊन नृत्य करीत होते. पण तो देशाचा ध्वज तिरंगा नव्हता. त्यावर अशोकचक्र नव्हते. केवळ गीताचा परिणाम साधण्यासाठी तिरंग्यासारखा तो ध्वज होता. पण गीत सुरू असताना काही उत्साही कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन तो प्रेक्षकांंमध्ये फिरवायला प्रारंभ केला. तो तिंरगा ध्वज असल्याचे लक्षात आल्यावर सुखविंदरसिंगने हे गीतच थांबविले. तिरंगा ध्वज या गीतावर फिरविण्यापेक्षा तो शांतपणे पकडून उभे राहण्याचे आवाहन त्याने कार्यकर्त्यांना केले. आपल्या देशाच्या तिरंग्याचा अपमान होता कामा नये, असे म्हणून त्याने पून्हा गीताला प्रारंभ केला. याप्रसंगी त्याने उपस्थितांमधील लहान मुलांनाही स्टेवर नृत्यासाठी आमंत्रित केले आणि मुलांसोबत धम्माल करीत हे गीत सादर केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.