खादीच्या वस्त्रांवर सूट योजना : खा. विजय दर्डा यांच्या हस्ते गांधी जयंतीनिमित्त शुभारंभ
By Admin | Updated: October 3, 2014 02:49 IST2014-10-03T02:49:34+5:302014-10-03T02:49:34+5:30
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि खा. विजय दर्डा यांनी खादीच्या वस्त्रांवर सूट देणाऱ्या योजनेचा शुभारंभ आज गुरुवारी केला.

खादीच्या वस्त्रांवर सूट योजना : खा. विजय दर्डा यांच्या हस्ते गांधी जयंतीनिमित्त शुभारंभ
नागपूर : खादी केवळ वस्त्र नाही आणि या वस्त्रांचा व्यवसायही नाही. खादी हा स्वदेशीचा, परंपरेचा आणि देशाभिमानाचा एक विचार आहे. नागरिकांना स्वाभिमानाने जगणे शिकविणारा आणि भारतीय संस्कृती, अध्यात्माचा संदर्भ खादी वस्त्रांशी जुळला आहे, असा विचार व्यक्त करीत लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि खा. विजय दर्डा यांनी खादीच्या वस्त्रांवर सूट देणाऱ्या योजनेचा शुभारंभ आज गुरुवारी केला. हा कार्यक्रम खादी ग्रामोद्योग भांडार, सीताबर्डी येथे पार पडला.
म. गांधी यांच्या जयंतीनिमित्त खादी ग्रामोद्योग भांडार, सीताबर्डीच्यावतीने या योजनेला आज प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी खा. विजय दर्डा यांनी म. गांधी यांच्या पुतळ्याला वंदन करून पुष्प अर्पण केले. याप्रसंगी त्यांनी विविध प्रदेशांत तयार करण्यात येणाऱ्या खादीच्या वेगवेगळ्या वस्त्रप्रावरणांची माहिती घेतली. खादीचे वस्त्र तयार करण्यात झालेले बदलही त्यांनी समजून घेतले. याप्रसंगी त्यांनी काही खादीचे वस्त्र खरेदी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामोद्योग आयोगाचे संचालक राहुल गजभिये, भांडारचे व्यवस्थापक बबनराव पडोलिया, संस्थेचे उपाध्यक्ष मधुकररावजी चामंतलवार आणि संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच खादीप्रेमी नागरिक उपस्थित होते.
बर्डी येथील या खादी ग्रामोद्योग भांडारच्या इमारतीचे आणि भांडारचे उद्घाटन २३ फेब्रुवारी १९३५ साली म. गांधी यांच्या हस्तेच करण्यात आले होते. आजही हे भांडार त्याच स्थळी कायम आहे.
सकाळी ११ वाजता म. गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि खादीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने एक रॅली काढण्यात आली.
या रॅलीत भांडारच्या कार्यकर्त्यांसह शेकडो खादीप्रेमी नागरिक सहभागी झाले. खादी ग्रामोद्योग भांडार, बर्डी येथून या रॅलीला बबनराव पडोलिया यांच्या मार्गदर्शनात प्रारंभ करण्यात आला. झाशी राणी चौक, मुंजे चौकमार्गे व्हेरायटी चौक येथील म. गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ही रॅली विसर्जित करण्यात आली.
म. गांधींच्या विचाराचा प्रचार नव्या पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही रॅली काढण्यात आली. खादीवर पुढील ४५ दिवस सूट देण्यात येणार असून खादीप्रेमी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)