फौजदाराची तलावात उडी घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: December 4, 2015 03:17 IST2015-12-04T03:17:56+5:302015-12-04T03:17:56+5:30

मध्यरात्री पत्नीला फोन करून एका फौजदाराने (एएसआय) तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

Suicide by taking the plow in the Faujdar lake | फौजदाराची तलावात उडी घेऊन आत्महत्या

फौजदाराची तलावात उडी घेऊन आत्महत्या

आत्महत्येपूर्वी केला पत्नीला फोन : दारूने केला घात, पोलीस दलात खळबळ
नागपूर : मध्यरात्री पत्नीला फोन करून एका फौजदाराने (एएसआय) तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. ज्ञानेश्वर नामदेवराव इंगोले (वय ५५) असे मृत एएसआयचे नाव आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस नागपुरात येत असताना ही घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.
इंगोले सक्करदरा पोलीस ठाण्यात दीड वर्षांपासून कार्यरत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. स्वभावही तापट होता. न्यू डायमंडनगर खरबी येथे ते राहत होते. बुधवारी रात्री १० वाजता ते कर्तव्यावरून घरी परतले. जेवण केल्यानंतर बरळत असल्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी टोकले. दारूच्या व्यसनामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. यावरून त्यांचा घरच्यांसोबत वाद झाला. रागाच्या भरात इंगोले आपल्या पॅशन मोटरसायकलने घरून निघून गेले. मध्यरात्री त्यांनी पत्नीला फोन केला. ‘सक्करदरा तलावात उडी घेणार आहो’, असे सांगितले. पत्नीने त्यांची समजूत काढून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी काहीही ऐकून न घेता फोन कापला. दरम्यान, इंगोले यांच्या फोनमुळे हादरलेली त्यांची मुली, पत्नी, भाऊ आणि शेजारी तसेच सक्करदरा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावले. तलावाजवळ त्यांची मोटरसायकल आढळल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटेपर्यंत तलावात शोध घेण्याचे प्रयत्न केले, मात्र काहीही आढळले नाही. त्यामुळे इंगोले यांनी रागाच्या भरात फोन केला असावा आणि ते कुठे निघून गेले असावे, असा अंदाज काढून इंगोले यांचे कुटुंबीय आणि पोलीस परत गेले. (प्रतिनिधी)

मानसिक स्थिती बिघडल्यामुळे...!
गुरुवारी दुपारी २ वाजता सक्करदरा तलावात इंगोले यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी इंगोले यांचा मृतदेह बाहेर काढून कपडे तपासले. त्यांच्याजवळ एक ‘सुसाईड नोट’ आढळली. आपली मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे आत्महत्या करीत आहो. कुटुंबातील सदस्य अथवा अन्य कुणी जबाबदार नसल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. दरम्यान, इंगोले यांच्या आत्महत्येची वार्ता कळताच शहर पोलीस दलात खळबळ उडाली. सक्करदऱ्याचे पीएसआय नीलेश पुरभे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Suicide by taking the plow in the Faujdar lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.