४० एकरातील ऊस खाक
By Admin | Updated: November 20, 2014 01:01 IST2014-11-20T01:01:40+5:302014-11-20T01:01:40+5:30
शॉर्टसर्किटने शेतातील ऊस खाक झाल्याची घटना सावनेर तालुक्यातील आजनी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ४० एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून शेतकऱ्याचे ५० लाख रुपयांचे

४० एकरातील ऊस खाक
५० लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटने शेतात लागली आग
सावनेर : शॉर्टसर्किटने शेतातील ऊस खाक झाल्याची घटना सावनेर तालुक्यातील आजनी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ४० एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून शेतकऱ्याचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आजनी भागातील विद्युतपुरवठा पहाटे ४ वाजतापासून बंद होता. सकाळी १० वाजताच्या सुमारास कनिष्ठ अभियंता कापसे यांनी शहानिशा करून विद्युतपुरवठा सुरू केला.
दरम्यान, आजनी येथील पुरुषोत्तम धपके यांच्या शेतात विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यात ऊस पेटून खाक झाला. पाहता-पाहता ही आग बाजूच्याच नारायण धपके, मधुकर धपके, लेखराज धपके, आत्माराम कमाले यांच्या शेतापर्यंत गेली. त्यात जवळपास ४० एकरातील ऊस खाक होऊन सदर शेतकऱ्यांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आगीची माहिती मिळताच सावनेर नगर परिषद आणि खापा नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र शेताच्या मध्यभागापर्यंत पोहोचणे अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य नसल्याने हवेच्या गतीसोबत आग पसरत होती. जवळपास ४ तासानंतर आग विझली. (प्रतिनिधी)
गावकरी एकवटले
सकाळी लागलेली आग अग्निशमन दलही आटोक्यात आणू शकला नाही. हे पाहता गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे ही आग गावाच्या दिशेने गेली नाही म्हणून बरे झाले. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. आगीबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी आतराम, सावनेरचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांना माहिती मिळताच तेसुद्धा पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता कापसे यांच्यावर संताप व्यक्त केला. उपअभियंता चंद्रकांत मोहाडीकर हे घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांच्याकडे कापसे यांच्याबाबत तक्रार करीत कारवाईची मागणी केली. पुढील तपास ठाणेदार सपकाळ करीत आहे.