सुधाकर गजबे यांचे निधन
By Admin | Updated: February 3, 2015 01:03 IST2015-02-03T01:03:39+5:302015-02-03T01:03:39+5:30
गोवारी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्य अर्पण करणारे आदिवासी गोवारी समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधाकर गजबे यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.

सुधाकर गजबे यांचे निधन
गोवारी बांधवांचा प्रेरणास्रोत हरविला : एका लढवय्याची अखेर
नागपूर : गोवारी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्य अर्पण करणारे आदिवासी गोवारी समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधाकर गजबे यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.
दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी गोवारी समाजाची धुरा सांभाळली होती व समाजाच्या विकासाचा मुद्दा शासनाकडे लावून धरला होता. त्यांच्या निधनामुळे लढवय्ये नेतृत्व हरविले असल्याची भावना गोवारी समाजासोबतच सामाजिक वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
सुधाकर गजबे हे गेल्या दीड वर्षांपासून अर्धांगवायूमुळे आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत आणखी खालावली व सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
आज होणार अंत्यसंस्कार
सुधाकर गजबे यांच्या पार्थिवावर मंगळवार ३ फेब्रूवारी रोजी दुपारी ३ वाजता अंबाझरी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्लॉट क्र. ३, जुगलकिशोर लेआऊट, गोपालनगर येथून त्यांची अंत्ययात्रा निघेल.