कऱ्हांडल्यात नियमांची ऐसीतैसी

By Admin | Updated: December 2, 2015 03:15 IST2015-12-02T03:15:41+5:302015-12-02T03:15:41+5:30

डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे निसर्गरम्य रूप, अभयारण्याचा स्टार ‘जय’ आणि पर्यटकांना मोहीत करणारे ..

Such a system of money laundering | कऱ्हांडल्यात नियमांची ऐसीतैसी

कऱ्हांडल्यात नियमांची ऐसीतैसी

जिप्सी चालक करतो शुटिंग : अवेळी मिळतो मर्जीतील लोकांना प्रवेश
अभय लांजेवार उमरेड
डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे निसर्गरम्य रूप, अभयारण्याचा स्टार ‘जय’ आणि पर्यटकांना मोहीत करणारे ‘बछडे’ यामुळे उमरेड - कऱ्हांडला अभयारण्य सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. अभयारण्य म्हटले की, त्यासाठी काही नियम आणि नियमावली असते. मात्र या नियमांची ऐसीतैशी करण्याचा सर्रास प्रकार उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यात सुरू आहे. वन विभागही त्याचे खुलेपणाने समर्थन करीत आहे. त्यामुळे नियम तोडणाऱ्यांसोबतच वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे अपेक्षित आहे. वन विभागाने नियमावलींचा फज्जा उडवीत वन्यप्राण्यांचा ‘तमाशा’च मांडल्याचे भीषण चित्र तेथे असून वन्यप्रेमींमध्ये यामुळे संताप व्यक्त होते. अभयारण्यात होत असलेल्या नियमभंगाबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला.
१९० चौरस किलोमीटर परिक्षेत्रात असलेल्या उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यात कऱ्हांडला, पवनी, गोठणगाव आणि पुल्लर अशी चार प्रवेशद्वार आहेत. सध्या या चारही प्रवेशद्वारातून सकाळी ६ ते १० पर्यंत तर दुपारी २ ते सायंकाळी ६.३० पर्यंत अशा दोन टप्यात पर्यटकांना प्रवेश मिळतो. तेवढ्या वेळात एक वाहन सुमारे ४५ किलोमीटरचा प्रवास करू शकते. त्यातही पुल्लर प्रवेशद्वार, ठाणा चौपट तसेच सतीघाट तलाव याठिकाणी विसावा असल्याने जंगल सफारीसाठी पर्यटकांना वेळ अपुराच पडतो.
जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघोबांचे दर्शन झालेच तर याबाबतची खबरबात कानाकोपऱ्यात पसरवली जाते. अधिकाऱ्यांपर्यंत ही बाब जाताच अवेळी ‘पाहुणे’, ‘नातेवाईक’, ‘घनिष्ठ मित्र’, ‘दलालांचे हितसंबंधी’ अचानकपणे अवतरतात. मग वन अधिकारी पर्यटकांना हाकलून देण्यासारखे प्रकार करण्यास मागेपुढे पाहात नाही. यामुळे पर्यटकांची घोर निराशा होते. या सर्व प्रकाराचे ‘लोकमत’ने व्हिडिओ शुटिंग केले आहे. विशेषत: जंगल सफारीसाठी अवेळी प्रवेश दिला जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमी करीत आहे.

वाहनांची उलटी दिशा
आत प्रवेश केल्यानंतर जिप्सी अथवा वाहनांचा विशिष्ट मार्ग ठरविण्यात आला आहे. परंतु काही विशिष्ट लोकांना वन विभागाने सवलतच बहाल केल्याचे वास्तव पर्यटकांच्या लक्षात येत आहे. यामुळे वनविभागाचे कठोर नियम ‘व्हीआयपी’ लोकांसाठी लागू होत नाही. शिवाय वन्यजीव प्रेमी असोत की त्यांचे सगेसोबती अशांना तसेच त्यांच्या वाहनांना विनापास अभयारण्यात प्रवेश दिला जाऊ नये, अशीही मागणी व्यक्त होत आहे. उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यात असाच प्रकार नुकताच उघडकीस आला. तो प्रकारही व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. यामध्ये एमएच-४०/केआर-७९९२ क्रमांकाचे वाहनातून आलेल्या ‘व्हीआयपीं’ नी वाघोबांचे दर्शन घेतल्यानंतर वाघ असलेल्या ठिकाणाहून कार वळविली. त्यानंतर ज्या मार्गाने ती कार आली, त्याच मार्गाने परत गेली.

वन अधिकारी म्हणतात...
उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यात सर्रासपणे अनुभवास येणाऱ्या या घडामोडींबाबत वनपरिक्षेत्राधिकारी जी. एफ. लुचे यांना विचारणा केली असता, एखादवेळी दूरच्या अंतरावरून कुणी आला तर त्याला परत कसे पाठवणार. शिवाय एखादवेळी वरिष्ठांकडून आदेश येतात, त्यांचा शब्द पाळावा लागतो, असेही ते अवेळी प्रवेशाबाबतच्या प्रकरणी बोलले. ‘वन-वे’ चा रस्ता एकच आहे, अन्य मार्गाने टू-वे वाहने धावू शकतात. चालकच शुटिंग करीत असल्याची बाब सांगितल्यावर जिप्सी चालकांना मोबाईल वापरण्याची बंदी केल्याची बाब त्यांनी व्यक्त केली. नियमावली तोडून कुणीही अशाप्रकारची वर्तवणूक करीत असेल तर त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल, अशा शब्दात जी. एफ. लुचे यांनी स्पष्ट केले. याबाबत वनपाल एन. एम. पुरी यांना विचारणा केली असता, मी स्वत: कर्तव्यावर असताना अवेळी वाहने सोडत नाही. मी अन्य ठिकाणी तपासणीच्या कामात असताना असा प्रकार झाला असेल तर मला माहीत नाही, म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.

चालक करतो मोबाईलने शुटिंग
जंगल सफारीदरम्यान यदाकदाचित वन्यप्राणी नजरेस पडलेच तर जिप्सीचा चालकच वाहन थांबवून, स्टेअरिंग सोडून, सीटवर उभा होत मोबाईलने स्वत:च शुटिंग करतो, फोटोही काढतो. अशा घटना पर्यटकांनी प्रत्यक्षात बघितल्या आहेत. लोकमत चमूने हा सर्व प्रकार व्हिडिओ शुट केला. पंकज धांडे असे त्या जिप्सी चालकाचे नाव आहे. एमएच-३१/एच-१८०३ क्रमांकाची जिप्सी त्याने वाघाचे चार बछडे दिसताक्षणी थांबविली. त्यानंतर स्टेअरिंग सोडून तो चालक सीटवर उभा होऊन स्वत:च शुटिंग करण्याच्या आणि फोटो काढण्याच्या कामात मग्न झाला. अशावेळी एखाद्या वन्यप्राण्याचा हल्ला झालाच तर मग पर्यटकांच्या सुरक्षिततेचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. या जीवघेण्या प्रकाराबाबत काहींनी हटकल्यानंतर पंकज धांडे नावाच्या या जिप्सी चालकाने ‘हातवारे’ दाखवत वेगळेच इशारे दिले. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने व्हिडिओ शुट केला असून वनमंत्र्यांपर्यंत तो पोहोचला आहे. त्यासोबतच काही आमदारांना याबाबत माहिती मिळताच त्यांनीही अधिवेशनात हा प्रश्न लावून धरला जाणार असून संबंधित चालकावर आणि वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Such a system of money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.