असे ‘माहेर’ गोड बाई
By Admin | Updated: July 21, 2014 00:55 IST2014-07-21T00:55:07+5:302014-07-21T00:55:07+5:30
बाहेर पाऊसधारा आणि वानखेडे सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह ... एकच जल्लोष! युवती, महिला, वृद्धा साऱ्याच चिंबचिंब... कुणी उखाणे घेण्यात तर कुणी कविता करण्यात. कुणी कोडे

असे ‘माहेर’ गोड बाई
माहेरच्या आठवणीत रममाण झाल्या सखी : कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद
नागपूर : बाहेर पाऊसधारा आणि वानखेडे सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह ... एकच जल्लोष! युवती, महिला, वृद्धा साऱ्याच चिंबचिंब... कुणी उखाणे घेण्यात तर कुणी कविता करण्यात. कुणी कोडे सोडविण्यात तर कुणी मेंदीच्या रंगात. यातच ‘एक मिनिट गेम शो’चा धमाका आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी साधलेला संवाद ... अविस्मरणीय दिवस ... मनाला इतके निवांत करणारे की स्ट्रेस-बिस शब्दच पोकळ करून टाकणारे...मायेची ऊब देऊन एक नवी ऊर्मी निर्माण करणारे...असे ‘माहेर’ गोड बाई.
औचित्य होते लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘माहेर’ या कार्यक्रमाचे. राजेंद्र मुळक लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने रविवारी आयोजित या ‘माहेरा’त सहभागी झालेल्या प्रत्येक सखीने मौजमस्तीची एकही संधी न दवडता आपल्या माहेराच्या आठवणीत रममाण झाल्या. तितक्याच गहिवरल्यादेखील.
उद्घाटन ऊर्जा, नियोजन मंत्री राजेंद्र मुळक व अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्कार विद्या सागर संस्थेच्या संचालिका पद्मजा पाटील, समाजसेविका स्वाती रोटेले, अॅड. स्मिता सिंगलकर, वीणा दुरुगकर, प्रीती जरगर, नगरसेविका प्रगती पाटील, पद्मा उईके, माजी नगरसेविका कुसुम घाटे आदी उपस्थित होत्या.
मुळक म्हणाले, महिलांसाठी मला खूप काही करायचे आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे आणि देत राहणार आहे. महिलांनी कुठलाही अन्याय सहन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. उसगावकर यांनी सखींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, हा कार्यक्रम पाहून मलाही ‘माहेर’मध्ये आल्यासारखे वाटत आहे. सखींची गर्दी पाहून माहेरची ओढ लक्षात येते. उद्घाटनानंतर अशी मी, वन मिनिट शो, उखाणे स्पर्धा, एक मिनिट गेम शो असा भरगच्च खजिना खास सखींसाठी खुला झाला. उखाणे स्पर्धेत पन्नासच्या वर सखींनी उखाणे घेतले. प्रत्येक उखाण्याला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत होती. काही सखी यजमानांचे नाव घेताना लाजल्या, अडखळल्याही; मात्र ही आपली भारतीय संस्कृती, असे प्रेक्षक सखी एकमेकांना समजावून सांगत होत्या. ‘अशी मी’ या स्पर्धेत कितीही कठीण प्रसंग आला तरी मागे हटले नाही. श्रम, जिद्द आणि चिकाटीने कुटुंबाला सावरले. अशा एक नाही तर चाळीसवर सखींनी आपल्या यशोगाथा सांगितल्या. यावेळी उपस्थित सखींनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
‘एक मिनीट गेम शो’मधून सखींनी अनुभवले बालपण
‘माहेर’ या कार्यक्रमाला अँकर, शुभम केचे याच्या ‘एक मिनीट गेम शो’ने आणखी रंगत आणली. ‘आर्म रेसलिंग’, ‘टंग टिष्ट्वस्टर’, टिकली गेम, बॉलिवूड इन्फॉर्मेशन, थर्माकोल हेराफेरी आणि ‘सेफ्टी पीनचा हार’ या अशा फनी गेम्सचा समावेश होता. या खेळांच्या माध्यमातून सगळ्यांनीच आपले बालपण ‘एन्जॉय’ केले. बाहेर धो-धो पाऊस असताना सभागृहाच्या आतील सखींना या पावसाचा जणू विसरच पडला होता. या खेळांच्या माध्यमातून एक निखळ आनंद त्यांनी घेतला. कौटुंबिक जबाबदारी, वय आणि पद विसरून साऱ्याजणींनी साद घालत हा कार्यक्रम एन्जॉय केला. सर्व खेळांमधून उत्कृष्ट ठरलेल्या सखींना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण अर्चना नाईक, वंदना धोटे, साधना चिलमुलवार आणि सीमा भांगे यांनी केले. संचालन नेहा जोशी यांनी केले. कार्यक्रमाला साधना पापळकर, प्रिया छांगाणी, अर्पणा नाईक, लुसी सबास्टीन, इस्माईल बी शेख, अल्का जीभनकर, बॉबीताई, माधवीताई, गायत्री दंदेवार, शोभाताई, लक्ष्मी मेश्राम, ज्योती वारके, पूनम कोकारडे, संगमित्रा गजभिये, शालिनी नायडू, संध्या नायडू, प्रिती छांगानी, किरन तराल, नंदा कोल्हडकर, लुसी बुर्नेड, हेलन अब्रू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)