नोटांची अशीही ‘बंडल’बाजी
By Admin | Updated: April 3, 2017 02:47 IST2017-04-03T02:47:22+5:302017-04-03T02:47:22+5:30
साधारणत: बँकेतून नोटांचे बंडल मिळाल्यानंतर कुणीही त्या एका कडेने मोजून घेतात. मात्र जर घरी आल्यावर

नोटांची अशीही ‘बंडल’बाजी
चांगल्या नोटांना चिटकवल्या फाटक्या नोटा : बँकेमधून मिळाले ‘बंडल’
राजेश टिकले नागपूर
साधारणत: बँकेतून नोटांचे बंडल मिळाल्यानंतर कुणीही त्या एका कडेने मोजून घेतात. मात्र जर घरी आल्यावर मोजलेल्या नोटा आणि प्रत्यक्षातील नोटांची संख्या यात मोठा फरक असला तर, नक्कीच कुणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. असाच धक्का नागपुरातील एका नागरिकाला बसला असून त्यांनी बँकेतून काढलेल्या ‘बंडल’मधील अनेक नोटा फाटक्या आहेत. विशेष म्हणजे ‘बंडल’ मोजताना भल्याभल्यांनादेखील संशय येणार नाही इतक्या बेमालूमपणे जोडल्या आहेत. हा प्रकार इतरही अनेक नागरिकांसोबत घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जयताळा रोड येथील रहिवासी किशोर मेश्राम यांनी सुमारे महिन्याभरापूर्वी दोन वेगवेगळ्या बँकांमधील खात्यातून प्रत्येकी २४ हजार रुपये काढले. यात एका राष्ट्रीयीकृत व एका सहकारी बँकेचा समावेश होता. काढलेल्या पैशांमध्ये १०० रुपयांच्या २ ‘बंडल’चा समावेश होता. आवश्यकतेनुसार त्यांनी काढलेले पैसे खर्च करण्यास सुरुवात केली. मागील आठवड्यात भाजी व किराणा खरेदीसाठी १०० च्या एका ‘बंडल’मधील पैसे त्यांनी पत्नीला दिले. त्यांनी २६०० रुपये मोजून दिले होते.
मात्र दुकानदाराने दुसऱ्या बाजूने नोटा मोजल्या असता त्या १३०० रुपयांच्याच होत्या. दुकानदाराने उर्वरित पैशांची मागणी केली, मात्र आपण तर पूर्ण पैसे दिल्याचा दावा मेश्राम यांनी केला.
इतरांनाही बसू शकतो फटका
याबाबत बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांना विचारणा केली असता गोपनीयतेच्या अटीवर त्यांनी असा प्रकार बँकेतून शक्य नसल्याचे सांगितले. एखाद्या व्यक्तीने हे ‘बंडल’ बँकेत जमा केले असेल. नोटा मोजण्याच्या मशीनमध्ये १०० नोटा दाखविण्यात आल्या असतील व त्याच्या खात्यात तितकी रक्कम जमा झाली असेल. या नोटा बँकेत तपासण्यात आल्या नसतील व दुसऱ्या एखाद्या ग्राहकाला हे ‘बंडल’ देण्यात आले असेल. त्यातून हा प्रकार घडण्याची शक्यता आहे. मात्र संबंधित प्रकार हा गंभीर असून इतरांनाही असा फटका बसू शकतो, असे त्यांनी सांगितले.
हे तर नोटांचे ‘मॅजिक’च
या नोटा ज्या कुणी जोडल्या आहेत, त्या जाणूनबुजून समोरच्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्याच इराद्याने लावल्या आहेत. तीन फाटके तुकडे एकत्र करून काही नोटा तयार करण्यात आल्या असून त्या दुसऱ्या चांगल्या नोटांना चिपकविण्यात आल्या आहेत. एका कडेने मोजल्या असत्या सर्व नोटा चांगल्या असल्याचे वाटते. मात्र ज्या कडेने रबर लावण्यात येते तेथून मोजल्या असत्या या नोटा कमी असल्याचे लक्षात येते. हे नोटांचे ‘मॅजिक’ नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे. या नोटा दोनपैकी नेमक्या कुठल्या बँकेतून मिळाल्या हे निश्चितपणे सांगू शकत नाही, असे मेश्राम यांनी सांगितले.