पाच उपद्रवी माकडांना पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:08 IST2021-01-09T04:08:29+5:302021-01-09T04:08:29+5:30
रामटेक : शहरात माकडांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यातील काही माकडांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून, माकडांनी चावा ...

पाच उपद्रवी माकडांना पकडण्यात यश
रामटेक : शहरात माकडांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यातील काही माकडांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून, माकडांनी चावा घेतल्याने आठ जण जखमी झाले आहेत. या उपद्रवी पाच माकडांना पकडण्यात वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश आले आहे.
या माकडांनी माजी नगराध्यक्ष गजानन भेदे यांच्यासह अन्य आठ जणांवर हल्ला चढवून त्यांना चावा घेत जखमी केले हाेते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. या काळ्या ताेंडाच्या उपद्रवी माकडांचा कायम बंदाेबस्त करण्याची मागणीही करण्यात आली हाेती. त्यासाठी नागपूरहून वन विभागाची रेस्क्यू टीम बाेलावण्यात आली हाेती. या टीमने शहरातील राखी तलाव परिसरात पिंजरे लावले हाेते. यात शुक्रवारी (दि. ८) दुपारी १ वाजताच्या सुमारास पाच उपद्रवी माकडे अडकली. त्यांना पकडून चाेरबाहुली (ता. रामटेक) येथील जंगलात दूरवर साेडण्यात आले आहे, अशी माहिती रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेंडे यांनी दिली. माकडांना पकडण्यात देवेंद्र अगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पंकज कारामोरे, ए. एम. ढाले, दीनदयाल सरोदे, अमोल अंबादे, आकाश दुधपचारे, कैलास स्वामी, चालक आशिष महाले, प्रकाश गायकवाड, बंडू मंगर, कमलेश गेडाम यांनी सहकार्य केले.