शासनाच्या भूमिकेवर ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाचे यश अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST2021-07-19T04:07:00+5:302021-07-19T04:07:00+5:30
मोरेश्वर मानापुरे नागपूर : महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पात केंद्र आणि राज्य शासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून रेल्वेचे कोच खरेदीसाठी ...

शासनाच्या भूमिकेवर ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाचे यश अवलंबून
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पात केंद्र आणि राज्य शासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून रेल्वेचे कोच खरेदीसाठी उद्योजकांना जोडण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनवर टाकली आहे.
प्रकल्पात उद्योजकांना सहभागी करण्याची घोषणा २१ फेब्रुवारीला साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्थानकावरील सभागृहात उद्योजकांच्या मेळाव्यात गडकरींनी केली होती. त्यांच्या आवाहनानंतर तेव्हा काही उद्योजक तर आता जवळपास १० उद्योजकांनी कोचेस खरेदी करून या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. उद्योजकांच्या सहभागामुळे या प्रकल्पाला बळ मिळाले आहे. त्यामुळेच पूर्वी सहा कोचची रेल्वे ३६ कोटी रुपयांत मिळणार होती, पण चर्चेनंतर टीटागढ वॅगन लिमिटेड कंपनीने ३० कोटी रुपयात देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा भविष्यातील वाटचालीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नवीन डीपीआरनुसार ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे आठ कोचची राहणार आहे.
कॅबिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा
उद्योजकांच्या सहभागामुळे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर-वर्धा ७८.८ किमी लांबीच्या पहिल्या कॅरिडोरमध्ये मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत: पुढाकार घेऊन प्रकल्पाची बारीकसारीक माहिती घेऊन पहिल्या टप्प्याला कॅबिनेटच्या मंजुरीसाठी प्रयत्न करीत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने विदर्भाच्या विकासासोबतच रोजगार निर्मितीचे मोठे माध्यम ठरणाऱ्या या प्रकल्पावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे उद्योजकांचे मत आहे.
एमएसएमई मंत्रालय व बँकांकडून उद्योजकांना अपेक्षा
उद्योजकांच्या मेळाव्यात प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना कमी व्याजदरात एमएसएमई मंत्रालयातर्फे अर्थसाहाय्य करण्याची तयारी गडकरींनी दर्शविली होती. पण आता त्यांच्याकडे या मंत्रालयाचा कार्यभार नाही. पण गडकरी केंद्रात वरिष्ठ मंत्री असल्याने त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यामुळे काहीही अडचणी येणार नाहीत, असे काही उद्योजकांचे मत आहे. याशिवाय देशातील मोठ्या प्रकल्पांना विदेशी बँका व आर्थिक संस्था कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करतात, त्याचप्रमाणेच या प्रकल्पासाठीही कर्ज पुरवठा व्हावा, अशी उद्योजकांची मागणी आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनीही विशेष प्रकल्प समजून कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी पुढाकार घ्यावा. याकरिता केंद्र व राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा
प्रकल्प वेळेत सुरू न झाल्यास गुंतवणूक वाढणार आहे. अर्थात तोटा वाढेल. याकरिता सर्व परवानगी संबंधित विभागाने वेळेत द्याव्यात, अशी उद्योजकांची मागणी आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर कार, सार्वजनिक बसेस आणि दुचाकीचा उपयोग कमी होईल. त्यामुळे इंधनाची विक्री कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होईल. अशा स्थिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून उद्योजकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि उद्योजकांना गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार असल्याने वैदर्भीयांसाठी महत्त्वाचा ठरेल, असा उद्योजकांना विश्वास आहे.
पहिल्या टप्प्यात महामेट्रो चालविणार रेल्वे
पहिल्या टप्प्यात ब्रॉडगेज मेट्रो चालविण्याची जबाबदारी महामेट्रोची तर दुसऱ्या टप्प्यात स्पेशल पर्पज कंपनीची राहील. या प्रकल्पासाठी एमएसएमई मंत्रालयातर्फे कर्ज देण्यात येणार आहे.
डॉ. बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.
उद्योजकांना व्यवसायाच्या संधी
प्रकल्पाद्वारे गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे रोजगार निर्मिती वाढेल. गुुंतवणुकीसाठी अनेक उद्योजक पुढे आले आहे. त्यांना मोठ्या प्रकल्पाप्रमाणेच कमी व्याजदरात कर्ज मिळावे.
सुरेश राठी, अध्यक्ष, व्हीआयए.