उपराजधानीत पाऊस मुक्कामी
By Admin | Updated: August 5, 2015 02:54 IST2015-08-05T02:54:46+5:302015-08-05T02:54:46+5:30
मागील महिनाभरापासून रुसून बसलेल्या पावसाने काल रात्रीपासून दमदार एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे, या पावसाने उपराजधानीतही मुक्काम ठोकला आहे.

उपराजधानीत पाऊस मुक्कामी
‘नॉनस्टॉप’ बरसला : नागपुरात ३४.२ मिमी
नागपूर : मागील महिनाभरापासून रुसून बसलेल्या पावसाने काल रात्रीपासून दमदार एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे, या पावसाने उपराजधानीतही मुक्काम ठोकला आहे. सोमवारी उपराजधानीत हलका पाऊस पडला. परंतु रात्री उशिरापासून त्याने चांगलाच जोर पकडला. यानंतर तो मंगळवारी दिवसभर ‘नॉनस्टॉप’ बरसला. त्यानुसार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत नागपुरात ३४.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
हवामान खात्याच्या मते, बंगालच्या उपसागरातील आद्रतेमुळे ओडिशा, झारखंड व छत्तीसगड राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यातून पुढील २४ तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार पाऊस झाला. विशेष म्हणजे, या पावसाचा शेतकऱ्यांना सर्वांधिक फायदा झाला. विदर्भातील शेतकऱ्याचा मागील काही दिवसांपासून जीव टांगणीला लागला होता. शेतातील पिके पावसाअभावी माना खाली टाकू लागले होते. परंतु या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील पुन्हा हसू परतले. आॅगस्ट हा सर्वांधिक पावसाचा महिना समजल्या जातो. त्यानुसार या महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली आहे. (प्रतिनिधी)
वस्त्यामध्ये पाणी शिरले
दिवसभर नॉनस्टॉप बरसलेल्या पावसात दुपारी उच्च न्यायालयाशेजारी एक झाड कारवर कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय अंबाझरी मार्गावरील माटे चौकाशेजारी एका झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली होती. कळमना परिसरातील रामानुजनगर, लक्ष्मीनगर व सूर्यनगर भागात पाणी भरले होते. उत्तर नागपुरातील कामगार नगर, रमाईनगर, तक्षशीलानगर, नालंदानगर व संघर्षनगर परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना पुढे आली आहे. सोबतच मानकापूर, गोधनी, पिवळीनदी, कामठी रोड, यादवनगर व इंदिरामाता नगर परिसरातील नागरिकांनासुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागला. गोधनी परिसरातील अन्नबाबा नगर जलमय झाले होते. मानकापूर रिंग रोडशेजारच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी भरले होते.