उपवनसंरक्षक भट एसीबीच्या जाळ्यात

By Admin | Updated: May 31, 2015 02:43 IST2015-05-31T02:43:25+5:302015-05-31T02:43:25+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक मनोहर भट (वय ५६) यांच्याकडून १९ लाख २५ हजार रुपये रोख जप्त केले.

Subdivision loads in the ACB trap | उपवनसंरक्षक भट एसीबीच्या जाळ्यात

उपवनसंरक्षक भट एसीबीच्या जाळ्यात

१९ लाख रुपये जप्त : कारवाईने वनविभागात खळबळ
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक मनोहर भट (वय ५६) यांच्याकडून १९ लाख २५ हजार रुपये रोख जप्त केले. धरमपेठेतील म्हाडा कॉम्प्लेक्सजवळच्या खासगी बसस्थानकावर एसीबीने शुक्रवारी रात्री ८.३० वाजता ही कारवाई केली. या कारवाईने वन विभागात प्रचंड खळबड उडाली आहे.
अलीकडेच वन विभागातील वनरक्षक व वनपालांच्या बदल्या झाल्या, त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची ओरड होती. मोठमोठ्या रकमा घेऊन बदल्या करण्यात आल्याच्या तक्रारीही होत्या. एसीबीचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांना ही माहिती कळाली. त्यावरून भट यांच्यावर नजर ठेवण्यात आली. शुक्रवारी रात्री ते मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन पुण्याला जाणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यावरून एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर त्यांच्यावर नजर ठेवली. रात्री ८.३० ते आपल्या वाहनातून धरमपेठेतील बसथांब्यावर आले. पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये चढण्याच्या तयारीत असतानाच एसीबीचे उपअधीक्षक संजय पुरंदरे यांनी त्यांना रोखले.
रोकड आली कुठून?
नागपूर : उपअधीक्षकांनी त्यांच्याजवळच्या बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये १९ लाख, २५ हजारांची रोकड आढळली. या रकमेबाबत भट यांच्याकडून समाधानकारक माहिती न मिळाल्यामुळे त्यांना एसीबीने ताब्यात घेतले.
एसीबी कार्यालयात भट यांची प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. मात्र, त्यातही या रकमेबाबत भट यांच्याकडून ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे एसीबीने ही रक्कम जप्त केली. भट यांच्याकडे ही रोकड कुठून आली, ते ती कुणाला देणार होते, त्याबाबतची चौकशी केली जात आहे. दोन दिवस ही चौकशी चालेल. त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाईत पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, वासुदेव डाबरे, हवालदार विलास खणके, संतोष पुंडकर, नायक अजय यांचा सहभाग होता.
बंगल्यांची झडती घेणार
दीपक भट मूळचे सातारा येथील रहिवासी आहेत. मात्र, पुण्याच्या सहकार नगरात ते राहतात. १० महिन्यांपूर्वी ते नागपुरात बदलून आले. वनविभागाच्या बंगल्याव्यतिरिक्त त्यांनी शहरात एक पॉश सदनिका भाड्याने घेतली होती. बहुतांश वेळा ते शनिवारी - रविवारी पुण्याला ‘बॅग’ घेऊन जायचे. अनेकांची नजर असल्यामुळे ही ‘बॅग’ वनविभागात चर्चेचा विषय ठरली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, २७ मे २०१५ ला वनविभागातील ८० वनरक्षकांची बदली झाली. त्यात लाखोंचे वारेन्यारे झाल्याची चर्चा होती. दरम्यान, भट यांच्या स्थानिक आणि पुण्यातील बंगल्याची चौकशी करण्यासाठी एसीबी कोर्टाकडून परवानगी मिळवणार आहे. ती मिळेपर्यंत भट यांच्याकडून ‘हालचाल‘ होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांनी लोकमतशी बोलताना दिली. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभूर्णीकर यांना विचारल्यानंतर त्यांनी भट यांनी केलेल्या बदल्यांना स्थगिती देऊन पुढील चौकशी करीत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Subdivision loads in the ACB trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.