कारचालक भामट्यांची सिव्हिल लाइन्समध्ये स्टंटबाजी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST2021-08-21T04:12:16+5:302021-08-21T04:12:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - वर्दळीच्या मार्गावर वेगाशी स्पर्धा करून कारमधून स्टंटबाजी करणाऱ्या भामट्यांना गुरुवारी पोलिसांनी दणका दिला. मोहसिन ...

कारचालक भामट्यांची सिव्हिल लाइन्समध्ये स्टंटबाजी ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वर्दळीच्या मार्गावर वेगाशी स्पर्धा करून कारमधून स्टंटबाजी करणाऱ्या भामट्यांना गुरुवारी पोलिसांनी दणका दिला. मोहसिन फिरोज खान, अनिस अहमद मोहसिन अहमद पिंजारा, विक्की रवींद्र जांगडे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांचा चवथा साथीदार सुमीत मातुरकर फरार आहे.
बुधवारी रात्री व्हीसीए चाैक, सिव्हिल लाइन, रिझर्व बँक चाैक परिसरात कारचालक भामट्यांनी प्रचंड हैदोस घातला. मोहसिन त्याची एमएच ३१ - डीसी ३३७६ क्रमांकाची तसेच सुमीत एमएच ०४ - ईएफ ३५६४ क्रमांकाची कार वेगाशी स्पर्धा करत चालवित होते आणि मध्येच स्केटही करत होते. त्यांची स्टंटबाजी सुरू असतानाच आरोपी अनिस (एमएच ३१ - बीबी ३५९८) तसेच विक्की (एमएच ३१ - एआर ६०५३) क्रमांकाची कार घेऊन आले आणि त्यांनीही स्टंटबाजी सुरू केली. त्यांचा हैदोस बघून अनेकांनी व्हिडिओ बनविला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करतानाच शहर पोलिसांच्या व्टिटर अकाउंटवरही अपलोड केला. त्यामुळे वरिष्ठांनी त्याची तत्काळ दखल घेतली. स्टंटबाजीच्या नावावर स्वत:सोबत दुसऱ्यांच्याही जिवाशी खेळणाऱ्या या भामट्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिले. त्यानुसार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण मालविय, राजपूत, सदरचे ठाणेदार विनोद चाैधरी सहायक निरीक्षक फर्नांडिस यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचे पत्ते शोधले. सदर पोलीस ठाण्यात उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून चार पैकी तिघांना अटक केली. चवथा आरोपी सुमीत फरार झाला. आरोपींच्या ताब्यातील चारही कार जप्त करण्यात आल्या.
---
तिकडे बेदरकारपणा, इकडे कान पकडून माफीनामा
स्वत:सह दुसऱ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या या आरोपींना पोलीस ठाण्यात आणताच त्यांनी रडारड सुरू केली. आरोपी उपद्रवी वृत्तीचे आहेत. त्यातील अनिस सलूनमध्ये काम करतो. विक्की फ्रूट विक्रेता असून, आरोपी मोहसिन ऑटो डिलर आहे. सुमीत काय करतो, ते स्पष्ट झाले नाही.
---
महिनाभरात दुसरी केस
धावत्या कारमधून स्टंटबाजी करणारी महिनाभरातील ही दुसरी केस आहे. यापूर्वी अशाच प्रकारे मिहान परिसरात स्टंटबाजी करणाऱ्या आरोपींच्याही पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत.
----