विद्यार्थी करणार शहर प्लास्टिकमुक्त
By Admin | Updated: July 10, 2014 00:51 IST2014-07-10T00:51:47+5:302014-07-10T00:51:47+5:30
उपयोगात नसलेले प्लास्टिक फेकण्यात येत असल्याने त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. नदी, नाल्यांमधून वाहून गेलेल्या प्लास्टिकमुळे जलचरांचा मृत्यू होतो. गाई, म्हशी ते खात असल्याने

विद्यार्थी करणार शहर प्लास्टिकमुक्त
पुण्याच्या ‘सागर मित्र’चा उपक्रम : नागपुरातही राबविणार
नागपूर : उपयोगात नसलेले प्लास्टिक फेकण्यात येत असल्याने त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. नदी, नाल्यांमधून वाहून गेलेल्या प्लास्टिकमुळे जलचरांचा मृत्यू होतो. गाई, म्हशी ते खात असल्याने त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. एकूणच पर्यावरणासाठी टाकाऊ प्लास्टिक एका संकटाच्या स्वरूपात पुढे आले आहे. यावर उपाय म्हणून पुण्याच्या ‘सागर-मित्र’ संस्थेने तेथील शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने एक अनोखा उपक्रम राबविला आणि तो यशस्वी करूनही दाखविला. नागपुरातील सामाजिक बांधिलकी असणाऱ्या काही संस्थांनी नागपुरात हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही शाळांनी यासाठी होकारही कळविला आहे.
पुण्याचे विनोद बोधनकर या योजनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी त्यांच्या ‘सागर -मित्र’ या संस्थेच्या माध्यमातून घराघरातील टाकाऊ प्लास्टिक विद्यार्थ्यांच्या मदतीने गोळा करण्याचा उपक्रम राबविला. २०११ मध्ये १५० विद्यार्थ्यांची साथ लाभली. आज ही संख्या पाच हजारावर गेली. दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या मदतीने या संस्थेने पुण्यात ५६ टन प्लास्टिक गोळा केले. हेच प्लास्टिक नदीत फेकण्यात आले असते तर सरासरी ५० कि.मी. नदी प्रदूषित झाली असती, असे बोधनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या सामाजिक उपक्रमाची दखल नागपूरच्या शिक्षा विकास परिषदेने घेतली. या संस्थेच्यावतीने अलीकडेच विद्यार्थ्यांसाठी बोधनकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बोधनकरांनी सादरीकरणाच्या माध्यमातून प्लास्टिकमुळे पर्यावरणार होणारे घातक परिणाम आणि ते थांबवण्यासाठी ’सागर-मित्र’ने राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमानंतर ३० प्रमुख नागरिकांची बैठक झाली. त्यात महापालिका, शिक्षण विभाग, प्लास्टिक उद्योजक आणि इतरही प्रमुख नागरिक उपस्थित होते. पुण्याप्रमाणेच नागपुरातही हा उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. सुरुवातीला ३० ते ४० शाळा यात सहभागी होण्याची शक्यता आहेत. महापलिकेनेही त्यांच्या शाळेत हा उपक्रम राबविण्याची तयारी दर्शविली आहे. मुलांनी गोळा केलेले प्लास्टिक खरेदी करण्यासाठी प्लास्टिक उद्योजक श्रीकांत धोंडरीकर यांनीही सहमती दर्शविली आहे. नागपुरात हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणारे रवींद्र जोशी यांनी ही माहिती दिली.
असा आहे उपक्रम
विनोद बोधनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक घरात कुठल्या ना कुठल्या वस्तूंसोबत प्लास्टिक पिशव्या किंवा पुडके येतात. ते फेकले जातात. त्यातून पुढे समस्या निर्माण होते. ते टाळण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ते गोळा करायचे. यासाठी शाळांचा उपक्रमातील सहभाग महत्त्वाचा ठरतो.
विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती दिल्यावर ते उत्स्फूर्तपणे यात सहभागी होतात. त्यांना त्यांच्या घरी जमा होणारे प्लास्टिक महिन्यातून एक वेळा शाळेत आणायचे आहेत. एका विशिष्ट दिवशी संस्थेची गाडी हे प्लास्टिक शाळेतून गोळा करेल व प्लास्टिक उद्योजक ते बाजारभावाप्रमाणे खरेदी करतील.पैसे शाळेला दिले जातील. शाळेने हा निधी पर्यावरणावर खर्च करावा, अशी अपेक्षा आहे. गोळा केलेल्या प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाईल.
यामुळे प्लास्टिक बाहेर फेकले जाणार नाही व पर्यायाने त्यातून निर्माण होणारे दुष्परिणाम टळतील.
या उपक्रमात शाळेप्रमाणेच प्लास्टिक प्रक्रिया उद्योजकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. मुलांसाठी प्लास्टिक गोळा करणे सक्तीचे नाही. त्यांना बाहेरून गोळा करायचे नाही. घरातील प्लास्टिक घरातच सुरक्षित ठेवायचे आहेत. वेळेचा अपव्यय होत नसल्याने पालकांचाही त्याला विरोध होत नाही. प्लास्टिक खरेदीतून शाळेला पैसे मिळत असल्याने विद्यार्थ्यांनाही त्याचे पारिश्रमिक मिळाल्याचा आनंद होतो. त्यांच्या कामाचे कौतुकही होते. एकाप्रकारे पर्यावरणपूरक असा हा उपक्रम आहे. (प्रतिनिधी)