विद्यार्थी उपाशीच गेले महाविद्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:48 IST2017-07-21T02:48:50+5:302017-07-21T02:48:50+5:30

वसतिगृहावर शासनाचे वर्षाला कोटी रुपये खर्च होत असताना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

Students went hungry in college | विद्यार्थी उपाशीच गेले महाविद्यालयात

विद्यार्थी उपाशीच गेले महाविद्यालयात

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मेस व्यवस्थापकाची हकालपट्टी : मनीषनगरातील शासकीय वसतिगृहात सोयींचा अभाव
सुमेध वाघमारे/ आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वसतिगृहावर शासनाचे वर्षाला कोटी रुपये खर्च होत असताना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. गुरुवारी मनीषनगर येथील हजार मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ताच मिळाला नाही, परिणामी, विद्यार्थ्यांना उपाशीपोटी महाविद्यालयात जावे लागले. तर गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना अयोग्य वागणूक देत नियमानुसार भोजन देत नसल्याच्या तक्रारीचा प्रभाव आता पडला. मंगळवारी जुन्या मेस व्यवस्थापकाची हकालपट्टी करण्यात आली. तर नव्या मेस व्यवस्थापकाला पाहून घेण्याची धमकी मिळाली. भाड्याच्या इमारतीत असलेल्या या वसतिगृहावर दरमहा १ लाख ४२ हजार रुपये खर्च केले जात असले तरी ही इमारत वसतिगृहासाठी सोयीची नसल्याचे वास्तव आहे.
विशेष म्हणजे, सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या वसतिगृहाच्या गृहप्रमुखांकडे दोन वसतिगृहाचा कारभार देण्यात आला आहे. त्यातही एक वसतिगृह शहरात तर दुसरे ग्रामीण भागात आहे. यामुळे गृहप्रमुखांचा विद्यार्थ्यांवर वचक नसल्याचे चित्र आहे. परिणामी, मे २०१७ मध्ये गृहपालांनी वसतिगृहाच्या केलेल्या अचानक तपासणीत ५०वर दारूच्या रिकाम्या बॉटल्स मिळाल्या. यात आठ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली. परंतु या घटनेमुळे वसतिगृहाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फुकट का मिलता है, खाले
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ चमूला सांगितले, जुना मेस व्यवस्थापक विद्यार्थ्यांशी उद्धटपणे वागत होता. त्याच्याकडे आहाराविषयी तक्रार केल्यास ‘फुकट का मिलता है, खाले’ असे म्हणायचा. नियमानुसार नाश्त्यात अंडी देत नव्हता. एकच एक नाश्ता द्यायचा. भोजनही बेचव राहायचे. दोन वर्षांपासून त्याच्या विरोधातील तक्रारीवर आता कारवाई झाली. बुधवारपासून नवीन मेस व्यवस्थापक आला, परंतु गुरुवारी त्याने सकाळी नाश्ताच तयार केला नाही. यामुळे अनेकांना उपाशीपोटी महाविद्यालयात जावे लागले.

बेसमेंटमध्ये भोजनगृह
वसतिगृहाच्या ज्या बेसमेंटमध्ये विद्यार्थी आपल्या सायकली व इतर वाहन ठेवतात. त्याच बसेमेंटचा वापर भोजनगृहासाठी केला जातो. यामुळे माशा व कीटकांचा विद्यार्थ्यांना त्रास होतो. गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहाच्या खोल्यांची रंगरंगोटी झालेली नाही. स्वच्छतेचे कंत्राट दिले असले तरी पायऱ्या व बालकनीची योग्य पद्धतीने सफाई होत नसल्याचे दिसून येते.
निर्वाह भत्ता, स्टेशनरीचे उशिरा मिळतात पैसे
एप्रिल महिन्याचा निर्वाह भत्ता गेल्या महिन्यात मिळाला. मागील वर्षीच्या स्टेशनरीचे पैसे चार महिन्यानंतर मिळाले. यामुळे बसची पास काढण्यापासून ते शैक्षणिक साहित्य घेण्यात उशीर होतो. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Students went hungry in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.