विद्यार्थ्यांनी दिला ‘व्याघ्र संवर्धना’चा संदेश
By Admin | Updated: August 5, 2015 02:50 IST2015-08-05T02:50:05+5:302015-08-05T02:50:05+5:30
वन विभाग, सामाजिक वनीकरण व नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ‘ग्लोबल टायगर डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी दिला ‘व्याघ्र संवर्धना’चा संदेश
वन विभाग : ‘ग्लोबल टायगर डे’ साजरा
नागपूर : वन विभाग, सामाजिक वनीकरण व नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ‘ग्लोबल टायगर डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यात शालेय विद्यार्थ्यांनी भव्य रॅलीच्या माध्यमातून ‘व्याघ्र संवर्धनाचा’ संदेश दिला.
सर्वप्रथम सकाळी ७ वाजता महाराजबाग येथून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे, रात्रभरापासून सर्वत्र धो धो पाऊस सुरू असताना, या दोन्ही रॅलीमध्ये नागपूरकरांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीमध्ये शहरातील दहा शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोन्ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांनी फिरल्यानंतर महाराजबाग येथे समारोप करण्यात आला.
यानंतर लगेच सकाळी १० वाजता महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते व्हेरायटी चौकात ‘मूड अॅण्ड फॅक्टस् अबाऊट टायगर’ या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी, उपवनसंरक्षक जयतो बॅनजी, संजय देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, विनीत अरोरा, उमेश धोटेकर व स्वानंद सोनी उपस्थित होते. दुपारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. त्यानुसार यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक महीप गुप्ता होते. अतिथी म्हणून उपसंचालक किशोर मिश्रीकोटकर, गोपाल ठोसर, संजय देशपांडे व प्रफुल भांबुलकर उपस्थित होते. दरम्यान याच सभागृहात ‘ग्लोबल टायगर डे’ उत्सवाचा समारोप समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महीप गुप्ता यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)