अपघात टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
By Admin | Updated: August 5, 2015 02:57 IST2015-08-05T02:57:24+5:302015-08-05T02:57:24+5:30
फ्रेंडशिप डेचे औचित्य साधून आयआयटी होम संस्थेत जनआक्रोशच्या ‘सुरक्षित ट्रॅफिक-मिशन हम सबका’

अपघात टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
नागपूर : फ्रेंडशिप डेचे औचित्य साधून आयआयटी होम संस्थेत जनआक्रोशच्या ‘सुरक्षित ट्रॅफिक-मिशन हम सबका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १००० विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी शपथ घेतली.
विदर्भ आॅर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आशुतोष आपटे यांनी यावेळी अपघाताच्या विविध कारणांची माहिती दिली. निष्काळजीपणे गाडी चालवणे व वाहतूक नियमांचे पालन न करणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत, असे ते म्हणाले. जनआक्रोशचे श्रीकांत गुडधे यांनी रस्त्यावरील दुर्घटनांचे प्रमुख कारणे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना दाखविले. हेल्मेट, सीटबेल्टचा वाहन चालविताना वापर करणे तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, लाल सिग्नल असताना रस्ता पार करणे आदींमुळे होणाऱ्या तरुणांच्या अपघाताचे ह्रदयस्पशी व्हिडिओ त्यांनी सादर केले. रमेश सहारे यांनी विद्यार्थ्यांना रोड, ट्रान्सपोर्ट अॅण्ड सेफ्टी अॅक्ट या प्रस्तावित परिवहन कायद्याच्या तरतुदींची माहिती दिली. याप्रसंगी जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड यांनी नागपूर अपघातमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ब्रॅण्ड अॅम्बेसडर म्हणून काम करण्याचे आवाहन केले. तर सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी विद्यार्थ्यांना अपघात टाळण्याचा निर्धार करणारी शपथ दिली. निशा कोठारी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)