प्राचार्यांच्या समर्थनार्थ सरसावले विद्यार्थी
By Admin | Updated: November 9, 2016 03:17 IST2016-11-09T03:17:48+5:302016-11-09T03:17:48+5:30
एखाद्या शिस्तप्रिय प्राचार्यांवर आरोप होत असतील तर विद्यार्थी त्यांच्या समर्थनार्थ एकत्रितपणे उभे राहतात,

प्राचार्यांच्या समर्थनार्थ सरसावले विद्यार्थी
नागपूर विद्यापीठ :तक्रारी खोट्या असल्याचा दावा
नागपूर : एखाद्या शिस्तप्रिय प्राचार्यांवर आरोप होत असतील तर विद्यार्थी त्यांच्या समर्थनार्थ एकत्रितपणे उभे राहतात, असे दृश्य साधारणत: चित्रपटांमध्ये दिसून येते. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील मंगळवारी असेच चित्र दिसून आले. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थी प्राचार्यांच्या समर्थनार्थ पुढे आले. प्राचार्यांविरोधात होत असलेल्या तक्रारी खोट्या असून याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
लाखनी तालुक्यात समर्थ शिक्षण संस्थेतर्फे संचालित समर्थ महाविद्यालय आहे. डॉ.संजय पोहरकर हे या महाविद्यालयाचे गेल्या अनेक वर्षांपासून प्राचार्य आहेत. शिस्तीसाठी ते प्रसिद्ध असून त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक शैक्षणिक सुधारणादेखील झाल्या. मात्र अंतर्गत राजकारणातून त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप काही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. काही प्राध्यापकदेखील त्यांच्यात सहभागी आहे. हे विद्यार्थी वर्गखोल्यांमध्ये जाऊन प्राचार्यांच्या विरोधात खोटानाटा प्रचार करत असून यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तासिकादेखील विस्कळीत झाल्या आहेत. डॉ. पोहरकर यांना काही मूठभर विद्यार्थी व प्राध्यापकांकडून अंतर्गत राजकारणातून ‘टार्गेट’ करण्यात येत असल्याचा आरोप विद्यापीठात आलेल्या विद्यार्थ्यांनी केला.
यासंदर्भात या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. शिक्षणसंस्था व विद्यापीठाने यात मध्यस्थी करून अंतर्गत राजकारणातून करण्यात आलेले षड्यंत्र उधळून लावावे व महाविद्यालयात अभ्यासाचे वातावरण परत निर्माण करण्यासाठी प्राचार्यांच्या पाठीशी उभे रहावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. जर मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. (प्रतिनिधी)