‘नीट’मध्ये उपराजधानीतील विद्यार्थी माघारले
By Admin | Updated: August 18, 2016 02:06 IST2016-08-18T02:06:24+5:302016-08-18T02:06:24+5:30
‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’च्या (नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकालात उपराजधानीतील विद्यार्थी माघारले आहेत.

‘नीट’मध्ये उपराजधानीतील विद्यार्थी माघारले
अनेकांनी धरले ‘एमएचटी-सीईटी’ला जबाबदार
नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’च्या (नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकालात उपराजधानीतील विद्यार्थी माघारले आहेत. परीक्षेत नागपूरसह विदर्भातील विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ‘रँकिंग’ माघारली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार उज्ज्वल राठी याने ७२० पैकी ५७८ गुण मिळवित शहरातून प्रथम स्थान मिळविले आहे.
निनाद खांडेकर याला ५४२, निर्मल राठीला ५३९ गुण मिळाले आहेत. ‘नीट’ देणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी ‘एमएचटी-सीईटी’मध्ये चांगले गुण मिळवित पहिल्या २५ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले होते. परंतु ‘नीट’मध्ये त्यांचे ‘रँकिंग’ खालावले.
‘नीट’चे निकाल लक्षात घेता ‘सीबीएसई’ने ‘कट आॅफ’ गुणांत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. १४५ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यालादेखील समुपदेशन फेरीत सहभागी होण्याची संधी मिळेल. ‘नीट’च्या निकालासाठी अनेकांनी ‘एमएचटी-सीईटी’ला जबाबदार धरले आहे. ‘एमएचटी-सीईटी’त अकरावीच्या अभ्यासक्रमाचा समावेश नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अभ्यासावर जास्त लक्ष दिले नाही. परंतु त्यांना ‘नीट’मध्ये अडचणीचा सामना करावा लागला.(प्रतिनिधी)
विदर्भात १३६ जागा
‘नीट’मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय कोट्याअंतर्गत आरक्षित असलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येतील. विदर्भातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांत १३६ जागा आहेत. यातील ‘बीडीएस’च्या सात जागा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत. या जागांवर प्रवेशासाठी समुपदेशन फेरीला २२ आॅगस्टपासून सुरुवात होईल.