मूलभूत सोयींसाठी ‘माफसू’त विद्यार्थ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: September 2, 2014 01:13 IST2014-09-02T01:13:05+5:302014-09-02T01:13:05+5:30
मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, या मागणीसाठी ‘माफसू’तील (महाराष्ट्र राज्य अॅनिमल अॅन्ड फिशरी युनिव्हर्सिटी) विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध सोमवारी आंदोलन केले. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी

मूलभूत सोयींसाठी ‘माफसू’त विद्यार्थ्यांचे आंदोलन
नागपूर : मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, या मागणीसाठी ‘माफसू’तील (महाराष्ट्र राज्य अॅनिमल अॅन्ड फिशरी युनिव्हर्सिटी) विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध सोमवारी आंदोलन केले. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी ‘माफसू’च्या परिसरात निदर्शनास सुरुवात केली.
सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने अखेर मागण्यांची पूर्तता करण्याचे तोंडी आश्वासन दिले. परंतु जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
विद्यापीठाच्या वतीने पशु, डेअरी आणि मत्स्यविज्ञान महाविद्यालय चालविण्यात येते. या तीन महाविद्यालयांमधील पशु व डेअरी महाविद्यालयांना वसतिगृहासह सगळ्या सोयींची पूर्तता करण्यात आली आहे. मात्र, तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेल्या मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडे येथील प्रशासनाने पार दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शासनातर्फे वेळोवेळी महाविद्यालयाला अनुदान मिळूनही वसतिगृह, कॉमन रूम, मुलींसाठी प्रसाधनगृह आदी मूलभूत आणि अत्यावश्यक सुविधा येथे नाहीत. यासंदर्भात वारंवार मागण्या केल्या; परंतु प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शनिवारीदेखील ‘माफसू’च्या कुलगुरूंसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी प्रशासनाने काही मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासन दिले होते.
परंतु प्रशासनाने तत्काळ आश्वासनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलनास सुरुवात केली.
कुलगुरू कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सायंकाळपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही. शेवटी विद्यापीठातर्फे विद्यार्थी कल्याण संचालकांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. परंतु प्रशासनाने लेखी आश्वासन द्यावे, असा पवित्रा घेत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)