विद्यार्थ्यांनी अनुभवली गावाची समृद्धी
By Admin | Updated: January 8, 2017 02:25 IST2017-01-08T02:25:35+5:302017-01-08T02:25:35+5:30
ग्रामीण जीवनाचे अनुभव शहरी मुलांसाठी दुर्मिळच. ग्रामीण व्यवस्था ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.

विद्यार्थ्यांनी अनुभवली गावाची समृद्धी
सोमलवारमध्ये साकारली निकालस वाडी
नागपूर : ग्रामीण जीवनाचे अनुभव शहरी मुलांसाठी दुर्मिळच. ग्रामीण व्यवस्था ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आपल्या संस्कृतीला जे सण, उत्सव लाभलेले आहेत ते खऱ्या अर्थाने आजही ग्रामीण भागातच साजरे होतात. शहरी मुलांना गावाची संस्कृती, तेथील वास्तव, जीवन आणि वातावरणाची अनुभूती देण्यासाठी सोमलवार हायस्कूलच्या निकालस शाखेने एक टुमदार गाव उभारून विद्यार्थ्यांना गावाची अनुभूती करून दिली.
शाळेच्या पटांगणात विद्यार्थी आणि शिक्षकांनी एक छोटेसे गाव साकारले आणि त्याला ‘निकालस वाडी’ असे नाव दिले. या वाडीत अगदी हुबेहुब गावाचे वैभव उभे केले. गावाच्या वेशीला हनुमानाचे मंदिर, भविष्य सांगणारा ज्योतिष, गावाच्या कुशीवर बजरंग आखाडा, झाडाखालची शाळा, आठवडी बाजार, तणसाच्या झोपड्या, जाते, पाटा-वरवंटा, चुली, पितळ आणि तांब्याची भांडी, छकडा, बैलगाडी, गाय-वासरू, गारुडी, कुंभार असे सर्व चित्र निकालस वाडीत उभे केले होते. संगणक आणि व्हिडिओ गेमच्या आकर्षणात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या गावात कंचे, सागरगोट्या हे खेळही उपलब्ध केले होते.
गावातील हातमाग व्यवसाय, कु टीर उद्योग, कठपुतळीचे खेळ हे सर्व वाडीत उभे केले होते. नागपंचमी, वटपौर्णिमा, पोळा हे पारंपरिक सणही या वाडीत साजरे करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या वाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण जीवन ही संकल्पना पुढे ठेवून शाळेच्या शिक्षिका सीमा जोशी व शिक्षक श्रीकांत धबडगावकर यांनी ही संकल्पना पुढे रेटली आणि विद्यार्थ्यांशी समन्वय साधून त्यांच्या मदतीने निकालस वाडी हे टुमदार गाव साकारले. ग्रामीण जीवनाचा आनंद लुटताना मुलांमध्ये कुतूहल दिसून आले. पालकांनीही निकालस वाडीला भेट देऊन या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे कौतुक केले. (प्रतिनिधी)