विद्यार्थ्यांनो, उद्योजक बना !
By Admin | Updated: July 1, 2015 03:14 IST2015-07-01T03:14:16+5:302015-07-01T03:14:16+5:30
तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कर्तृत्व व यशस्वी होण्याची जिद्द आहे.

विद्यार्थ्यांनो, उद्योजक बना !
उदय देसाई : रायसोनी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ
नागपूर : तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कर्तृत्व व यशस्वी होण्याची जिद्द आहे. त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करून शिक्षण झाल्यानंतर नोकरी मागण्यापेक्षा अनेकांना नोकरी देणारे उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत ‘आयआयटी हैदराबाद’चे संचालक डॉ. उदय देसाई यांनी व्यक्त केले. जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला ‘व्हीएनआयटी’चे माजी संचालक डॉ. एस. एस. गोखले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, नागपूर विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, ‘व्हीजेटीआय’चे संचालक डॉ. ओ.जी. काकडे, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रीती बजाज हे प्रामुख्याने उपस्थित होते. आजचा काळ हा स्पर्धेचा आहे व विद्यार्थ्यांनी स्वत:वर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे व आपल्या सभोवताली असलेल्या विविध समस्यांचे उत्तर केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच उत्तर मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची बरीच संधी आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थी इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या बळावर यशाचे शिखर पादाक्रांत करू शकतात. जागतिकीकरणाच्या या युगात नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज असल्याचे मत डॉ. काणे यांनी व्यक्त केले. डॉ. बजाज यांनी अहवाल वाचन केले तर डॉ. संजय वानखेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)