विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
By Admin | Updated: April 20, 2016 03:07 IST2016-04-20T03:07:42+5:302016-04-20T03:07:42+5:30
शिकवणी वर्गातून परत येत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला.

विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
तिघांना अटक : एमआयडीसीतील घटना
हिंगणा/नागपूर : शिकवणी वर्गातून परत येत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. अत्याचारामुळे मुलगी बेशुद्ध पडल्याने आरोपींनी तिच्यावर उपचार करून नंतर तिला तिच्या घराजवळ सोडले. सोमवारी रात्री ८ ते १०.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा मध्यरात्री उलगडा झाला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी राकेश जनकलाल पटले (वय २६), आकाश मधुकर दुपारे (वय १९) आणि मोहन विजय वर्मा (वय २०) तिघेही रा. राजीवनगर (हिंगणा रोड) या तिघांना अटक केली.
या प्रकरणाचा सूत्रधार राकेश पटले असून तो टॅक्सीचालक आहे, अशी माहिती मंगळवारी दुपारी पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांनी पत्रकारांना दिली. पीडित मुलगी अमरनगरात राहते. तिच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी आरोपी राकेशची तवेरा भाड्याने घेतली होती. तेव्हापासून आरोपी तिच्यावर डोळा ठेवून होता. सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास ती शिकवणी वर्गाला गेली होती. परत येताना दिसताच आरोपी राकेशने तिच्याजवळ कार नेली आणि काही कळण्याच्या आत तिला कारमध्ये ओढले. त्यावेळी कारमध्ये आकाश व मोहन बसून होते. आरोपींनी तिच्या हाताला बळजबरीने इंजेक्शन टोचले. ती बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी तिला मिहान परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तेथे आधी राकेश आणि नंतर आकाश व मोहनने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तिची शुद्ध हरपल्याने आरोपींनी तिच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ती हालचाल करीत नसल्यामुळे आरोपी घाबरले. त्यांनी तिला राजीवनगरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे उपचारानंतर या तिघांनी तिला तिच्या घरापासून काही अंतरावर सोडून पळ काढला. अत्याचारामुळे मुलीला चालताही येत नव्हते.
असा गवसला धागा
नागपूर : पीडित मुलीशी यापूर्वी एकाने अश्लील चाळे केले होते. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली होती, ही माहिती कळल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्या आरोपीच्या मुसक्या बांधल्या. त्याने गुन्ह्याचा नकार दिला. मात्र, पीडित मुलीच्या मागे राकेश नेहमी फिरतो, अशी माहिती त्याने दिली. त्यावरून पोलिसांनी राकेशच्या एका मित्राला ताब्यात घेतले. अपघात झाल्यामुळे तातडीने तवेरा पाहिजे आहे, असे सांगून राकेशला एमआयडीसीच्या एका चौकात बोलवून घेण्यात आले. अपहरण आणि बलात्कार करताना त्याने तोंडावर स्कार्फ बांधला होता. परंतु पोलिसांनी त्याला गरम करताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन साथीदारांचीही नावे सांगितली. त्यानंतर पहाटे अन्य दोन आरोपींनाही त्यांच्या घरून ताब्यात घेण्यात आले. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासात गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याची प्रशंसनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, हवालदार राजकुमार देशमुख, लक्ष्मण शेंडे, अविनाश बारापात्रे, नीलेश वाडेकर, राजेश सेंगर यांनी बजावली. आरोपींविरुद्ध भादंवि गुन्हा नोंदविण्यात आला असून, ठाणेदार एम.जी. नलावडे तसेच उपनिरीक्षक एस.एन. रामटेके यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
पहाटे सुरू झाली धावपळ
बरीच रात्र होऊनही मुलगी घरी न पोहोचल्यामुळे आधीच चिंतित असलेल्या कुटुंबीयांना नातेवाईकांचा फोन येताच ते तेथे पोहोचले. मुलीची अवस्था अन् नंतर तिने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे मुलीचे कुटुंबीयसुद्धा हादरले. बराच वेळ विचारविमर्श केल्यानंतर मुलीची आई मुलीला घेऊन मध्यरात्री एमआयडीसी ठाण्यात पोहोचली. गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कातकडे सोमवारी रात्रगस्तीवर होते. एमआयडीसी ठाण्यात ते पहाटे २ ला पोहोचले. गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कातकडे सोमवारी रात्रगस्तीवर होते. एमआयडीसी ठाण्यात ते पहाटे २ वाजता पोहोचले. तेथे पीडित मुलगी आपल्या आईसोबत अत्यवस्थ अवस्थेत बसल्याचे पाहून त्यांनी तिला विचारणा केली. पांढऱ्या रंगाच्या कारमधून तिघांनी अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचे तिने सांगताच कातकडे यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर पहाटे २.३० च्या सुमारास उपायुक्त बलकवडे ठाण्यात पोहोचले. अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.