विद्यार्थ्यांनी केला संकल्प : विजय दर्डा यांच्या आवाहनाला प्रतिसाद

By Admin | Updated: July 6, 2015 03:17 IST2015-07-06T03:17:53+5:302015-07-06T03:17:53+5:30

एखादी बाब किती कळकळीने आणि प्रामाणिकपणे आपण सांगतो, त्यावरही इतरांचा विशेषत: मुलांचा प्रतिसाद अवलंबून असतो.

Student Resolutions: Respond to the blessings of Vijay Darda | विद्यार्थ्यांनी केला संकल्प : विजय दर्डा यांच्या आवाहनाला प्रतिसाद

विद्यार्थ्यांनी केला संकल्प : विजय दर्डा यांच्या आवाहनाला प्रतिसाद

हेल्मेटशिवाय गाडी चालविणार नाही!
नागपूर : एखादी बाब किती कळकळीने आणि प्रामाणिकपणे आपण सांगतो, त्यावरही इतरांचा विशेषत: मुलांचा प्रतिसाद अवलंबून असतो. याचा प्रत्यय छात्रजागृती संस्थेद्वारा संचालित कळमना मार्गावरील जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेन्ट येथे आला. वाहन चालविताना हेल्मेट घातलेच पाहिजे कारण त्यामुळेच आपल्या प्राणांचे रक्षण होते ही बाब लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी शालेय मुलांना अतिशय आत्मियतेने समजावून सांगितली. खा. विजय दर्डा यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कॉन्व्हेन्टच्या मुलांनी भविष्यात गाडी चालविताना आम्ही हेल्मेटचा उपयोग करू, असा संकल्पच केला.
खा. दर्डा यांनी मुलांच्या प्रेमापोटी आत्मियतेने त्यांना हेल्मेट किती आणि कसे आवश्यक आहे. हे सांगितले. त्यानंतर खा. दर्डा यांच्या उपस्थितीत मुलांनी स्वयंस्फूर्तीने हेल्मेट घालण्याचा जाहीर संकल्प तर केलाच पण समाजातल्या आणि इतर संपर्कातल्या नागरिकांनाही हेल्मेट घालण्याचे आवाहन करू, असाही संकल्प केला. मुलांच्या या सकारात्मक प्रतिसादाने खा. दर्डा सुखावले. जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेन्टमधील पहिलीच दहावीची बॅच परीक्षेत १०० टक्के यशस्वी झाली. यातील सहा गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतर्फे खा. दर्डा यांच्या हस्ते मोपेड भेट देण्यात आली. मोपेडच्या चाव्या विद्यार्थ्यांना प्रदान करताना त्यांनी प्रथम मोपेडसह हेल्मेट आहे का, हे तपासले आणि मुलांना हेल्मेट घालण्याची विनंती केली.
याप्रसंगी खा. दर्डा म्हणाले, युवक हे या देशाची शक्ती आहे. त्यामुळेच प्रत्येकाला चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार मिळायला हवे, कारण त्यातूनच आपला देश प्रगती करणार आहे. पण देशात दरवर्षी रस्ते अपघातात चार लाख युवकांचा मृत्यू होतो. केवळ हेल्मेट न घातल्याने डोक्याला इजा होऊन हे मृत्यू होतात, याची खंत वाटते. युवा हेच या देशाचे भविष्य आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी वाहन चालविताना हेल्मेट घालावे आणि स्वत:च्या प्राणाचे, आयुष्याचे रक्षण करावे.
अपघातात एका क्षणात विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो, तेव्हा खूप दु:ख होते. पालकांनीही मुलांना हेल्मेटशिवाय गाडी चालवू देऊ नये, असे आवाहन खा. दर्डा यांनी तीनवेळा हात जोडून पालकांना आणि विद्यार्थ्यांना केले. त्यांच्या या आवाहनाला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद देत हेल्मेट घालण्याची शपथ घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Student Resolutions: Respond to the blessings of Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.