विद्यार्थी संघटनांचा ‘हल्लाबोल’

By Admin | Updated: March 27, 2015 01:55 IST2015-03-27T01:55:24+5:302015-03-27T01:55:24+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गुरुवारी विधीसभेची बैठक सुरू असताना परिसर विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने दणाणून गेला होता.

Student organizations 'attack' | विद्यार्थी संघटनांचा ‘हल्लाबोल’

विद्यार्थी संघटनांचा ‘हल्लाबोल’

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गुरुवारी विधीसभेची बैठक सुरू असताना परिसर विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने दणाणून गेला होता. पुनर्मूल्यांकन तसेच परीक्षा विभागाशी संबंधित मागण्यासांठी ४ विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते एकाच वेळी प्रशासकीय इमारत परिसरात धडकले. यात ‘अभाविप’ (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद), ‘एनएसयूआय’ (नॅशनल स्टुडन्ट्स युथ कॉंग्रेस), राष्ट्रवादी विद्यार्थी परिषद व ‘मनविसे’ (महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना) या संघटनांचा समावेश होता. वातावरण चिघळू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विद्यापीठाच्यावतीने आकारण्यात येणारे अमाप परीक्षा शुल्क, फेरमूल्यांकनाचा प्रश्न, न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत महाविद्यालयांकडून माहितीपुस्तकासाठी आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क, फेरमूल्यांकनात होणारी विद्यार्थ्यांची लूट, विद्यापीठ वसतिगृहात राहणारे अनधिकृत विद्यार्थी अशा विविध प्रश्नावर विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले व विधीसभा सदस्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या निकालामध्ये उत्तीर्ण होतात अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन शुल्क परत द्यावे अशी मागणी ‘अभाविप’ने केली. निकाल लवकर लावावे, विद्यार्थी वसतिगृहामध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थ्यांचा कार्य करण्याचा कालावधी वाढविण्यात यावा अशा मागण्या राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे करण्यात आल्या. कुलगुरू निवडीसंबंधी आक्षेप नोंदवित ‘मनविसे’च्या कार्यकर्त्यांनीदेखील घोषणाबाजी केली. तर एका खासगी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याच्या मुद्यावर ‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते आक्रमक झाले.

Web Title: Student organizations 'attack'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.