नागपूर (हिंगणा) : ट्रकने विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजता तिवस्कर वाडीत घडली. घरासमोरच विद्यार्थ्याचा प्राण गेला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. रायपूर तिवस्करवाडी येथील ऋषीकेश भैयाजी बागडे (१५) या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. ऋषीकेश हा नेहरू विद्यालयात इंग्रजी माध्यमात नववीत शिकत होता. आज त्याचा इंग्रजीचा पेपर होता. सर्दी खोकला झाल्याने तो सकाळी ९.३० वाजता सायकलने रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी निघाला. त्यावेळी तिवस्कर वाडीत राहणाऱ्या वासुदेव तिवस्कर यांच्या मालकीच्या ट्रकचा (एम.एच. ३२ बी ४७२०) चालक गजानन निखाडे रायपूर गावात जाण्यासाठी निघाला होता.भरधाव ट्रकने ऋषीकेशच्या सायकलला जबर धडक दिली. ट्रकच्या मागच्या चाकात सायकल आल्याने ऋषीकेश आत खेचला गेला. अपघातात सायकलचे दोन तुकडे झाले. ऋषीकेशच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले. यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने पळाला. ऋषीकेश अभ्यासात हुशार होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
...अन् परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यानं घरासमोर प्राण सोडला; ट्रकच्या धडकेत करुण अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:49 IST