रामटेक तालुक्यात विद्यार्थ्यांची अजुनही उपस्थिती कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:40+5:302021-02-05T04:42:40+5:30
रामटेक : रामटेक तालुक्यात सुरुवातीला ९ ते १२ व आता ५ ते ८ वर्ग सुरू झाले आहेत. पण अजूनही ...

रामटेक तालुक्यात विद्यार्थ्यांची अजुनही उपस्थिती कमीच
रामटेक : रामटेक तालुक्यात सुरुवातीला ९ ते १२ व आता ५ ते ८ वर्ग सुरू झाले आहेत. पण अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. ९ ते १२ वीची उपस्थिती ३९. ३३ टक्के तर बुधवारी सुरू झालेल्या वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांची उपस्थिती २६.२९ टक्के होती. रामटेकच्या गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण १२ केंद्र आहेत. वर्ग ९ ते १२ च्या ३९ शाळा आहेत. त्यामध्ये ९,६०४ विद्यार्थी हजेरीपटावर आहेत. पण यापैकी ३,७७८ विद्यार्थी उपस्थित होते. वर्ग ५ ते ८ च्या १४० शाळा आहेत. यामध्ये शिकणारे ८,९९३ विद्यार्थी आहेत. पण बुधवारी २,३६५ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. ७२२ शिक्षक कार्यरत असून, ५२३ शिक्षक उपस्थित होते. सगळ्या शिक्षकांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ४६९ शिक्षकांनी चाचणी केली. त्यापैकी ४ शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह निघाले आहेत. कोरोनाचे भय कमी झाले की विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असा आशावाद संगीता तभाने यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.