तिकीट मशीन नसल्याने स्टारबस सेवेत अडथळा
By Admin | Updated: April 3, 2017 02:55 IST2017-04-03T02:55:03+5:302017-04-03T02:55:03+5:30
नागपूर शहरात मार्चपर्यत ४३२ बसेस धावणार असल्याची ग्वाही महापालिका प्रशासनाने दिली होती.

तिकीट मशीन नसल्याने स्टारबस सेवेत अडथळा
डीआयएमटीएसच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : ४३२ पैकी २०० बसेस रस्त्यावर
नागपूर : नागपूर शहरात मार्चपर्यत ४३२ बसेस धावणार असल्याची ग्वाही महापालिका प्रशासनाने दिली होती. परंतु प्रत्यक्षात २०० बसेस शहरातील रस्त्यावर धावत आहेत. बसेस कमी असल्याने प्रवासी व विद्यार्थी त्रस्त आहेत. यामुळे शहर वाहतुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम लि. (डीआयएमटीएस )यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच कंपनीवर इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन उपलब्ध करण्याची जबाबदारी असताना त्यांच्याकडून मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. यामुळे स्टारबस सेवेत अडथळा निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी वंश निमय व स्कॅनिया कंपनीच्या लाल रंगाच्या अशा एकूण ४३२ बसेस शहरातील रस्त्यांवर होत्या. १ मार्च २०१७ पासून शहरातील वाहतूक व्यवस्था नवीन बस आॅपरेटरकडे सोपविण्यात आली. बसेसचे मार्ग निश्चित करणे, कंडक्टरची नियुक्ती, तिकीट विक्रीचा महसूल गोळा करणे व सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करण्याची जबाबदारी डीआयएमटीएस यांच्यावर सोपविण्यात आली होती. सध्या शहरात २०० बसेस धावत असून प्रत्येक बसला दोन तिकीट मशीनची गरज आहे. परंतु केवळ २०० मशीन उपलब्ध आहेत. यामुळे उर्वरित बसेच उभ्या असल्याने महापालिकेचा महसूल बुडत असल्याची माहिती आहे. बसेसची संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळत नाही. त्यातच इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
कंडक्टरला करावी लागते १६ तास ड्युटी
नियमानुसार स्टरबस कंडक्टरची ८ तासांची ड्युटी आहे. परंतु त्यांना १६ तास ड्युटी करावी लागते. आरोग्याचा विचार न करता त्यांना काम करावे लागत आहे. वंश निमय यांनी कमी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत समावून न घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात सर्व बसेस धावल्या असत्या तर सर्व कर्मचाऱ्यांना काम मिळाले असते. या संदर्भात सहायक कामगार आयुक्तांनीही महापालिका प्रशासनाला फटकारले आहे.
साध्या तिकिटाचा वापर का नाही?
इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनचा तुटवडा आहे तर साध्या तिकिटांचा वापर का केला जात नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. या तिकिटांचा वापर केला तर शहरबस सेवेवर याचा परिणाम होणार नाही. शहरातील रस्त्यावर सर्व ४३२ बसेस धावतील. प्रवाशांनाही त्रास होणार नाही. महापालिकेच्या महसुलात वाढ होईल. परंतु प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.