संघर्षाची फलश्रुती

By Admin | Updated: January 26, 2015 01:03 IST2015-01-26T01:03:42+5:302015-01-26T01:03:42+5:30

भंडारा जिल्ह्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनाही घराच्या मोबदल्यावर व्याज मिळावे यासाठी चार वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाची यशस्वी फलश्रुती झाली असून शासनाने

Struggle of struggle | संघर्षाची फलश्रुती

संघर्षाची फलश्रुती

गोसेखुर्द : प्रकल्पग्रस्तांना मिळणार व्याजाची रक्कम
नागपूर: भंडारा जिल्ह्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनाही घराच्या मोबदल्यावर व्याज मिळावे यासाठी चार वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाची यशस्वी फलश्रुती झाली असून शासनाने व्याजापोटी १३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
गोसेखुर्द प्रकल्पात गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरापोटी शासनाने मोबदला जाहीर केला होता. तो देण्यास विलंब झाल्याने त्यावर व्याज देण्यात आले.पण ही रक्कम फक्त भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनाच मिळाली होती. नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त त्यापासून वंचित होते. त्यामुळे भंडाऱ्याप्रमाणेच आम्हालाही ही रक्कम मिळावी, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची होती. संघर्ष समितीचा लढा चार वर्षांपासून सुरू होता. मधल्या काळात भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांकडून व्याजाची रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव होता.
मात्र त्याला कडाडून विरोध झाल्याने तो बारगळला. तत्कालीन विभागीय आयुक्त वेणूगोपाल रेड्डी व विद्यमान आयुक्त अनुपकुमार यांच्यासोबत चर्चेदरम्यान प्रकल्पग्रस्तांनी अनेक वेळा नागपूरच्या प्रकल्पग्रस्तांनाही व्याजाची रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनानेही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवशना दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही या मुद्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर शासनाने व्याजापोटी १३ कोटी ६७ लाखाचा निधी मंजूर केला आहे. हा निधी प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात वळता केला जाणार आहे.
दरम्यान यासंदर्भात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजत विलास भोंगाडे यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे सांगितले. प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने न्याय मिळाला, असे त्यांनी स्पष्ट केले.( प्रतिनिधी)

Web Title: Struggle of struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.