चिमुकल्या विधीला वाचविण्यासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 03:24 IST2016-10-14T03:24:08+5:302016-10-14T03:24:08+5:30
वय वर्षे सहा खरं तर आनंदाने हसण्या-बागडण्याचे दिवस. पण, याच वयाची चिमुकली विधी थेट मृत्यूशी संघर्ष करीत आहे.

चिमुकल्या विधीला वाचविण्यासाठी संघर्ष
डॉक्टरांनी सांगितल्या तीन शस्त्रक्रिया :
वडील मजुरी करून सहा लाख कधी मिळवणार?
नागपूर : वय वर्षे सहा खरं तर आनंदाने हसण्या-बागडण्याचे दिवस. पण, याच वयाची चिमुकली विधी थेट मृत्यूशी संघर्ष करीत आहे. तिला जन्मजात हृदयदोष असल्याने डॉक्टरांनी तीन शस्त्रक्रिया करायला सांगितल्या आहेत.
यासाठी तब्बल सहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मजुरी करून सहा लाख मिळणे कठीण असल्याने विधीचे वडील मुलीचे प्राण वाचविण्यासाठी मदतीच्या अपेक्षेने धडपडत आहेत.
विधी विजय किनगे असे या चिमुकलीचे पूर्ण नाव. ती अवघ्या साडेसहा वर्षांची आहे. आईवडिलांसोबत ती शुक्लानगर हावरापेठ येथे राहते. वडील मजुरी करतात. त्यांची मिळकत फार नाही. विधीला जन्मजात हृदयाचा दोष आहे. तिच्या हृदयात एक व्हॉल नाही, व्हेन नाही. त्यात पुन्हा होल निर्माण झाले आहे. त्यामुळे तिला सामान्य जीवन जगण्यासाठी एकाच वेळी तीन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. नागपुरातील डॉक्टरांनी यासाठी सहा लाखांचा खर्च सांगितला आहे. विधीची अवस्था अतिशय बिकट आहे. या आजारामुळे तिच्या चेहऱ्याचा भाग सोडला तर संपूर्ण शरीराची वाढ खुंटली आहे. तिला स्वत:हून बसता व उठता येणे कठीण आहे. त्यामुळे आई अश्विनी हिला सातत्याने विधीसोबतच राहावे लागते. तिला थोडा वेळही एकटे सोडता येत नाही. किनगे दाम्पत्यांचा चार वर्षाचा मुलगा आर्यन हा गेल्याच वर्षी आजारानेच मरण पावला. आर्थिक परिस्थितीमुळे मुलाचा योग्य उपचार करता येणे त्यांना शक्य झाले नाही. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते अजूनही सावरलेले नाही. यातच मुलीची अशी अवस्था त्यांना पाहावी लागत आहे. त्यामुळे आपल्या काळजाला कसेही करून बरे करण्यासाठी किनगे दाम्पत्याची पायपीट सुरू आहे. (प्रतिनिधी)
मदतीचे आवाहन
चिमुकल्या विधीला पुन्हा सामान्य जीवन जगता यावे म्हणून इच्छुक दानदात्यांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुकांना विधी व वडील विजय किनगे यांचे संयुक्त खाते असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या नरेंद्रनगर शाखेतील अकाऊंट नंबर ३५३५८५३३३२९ यात मदत करता येईल. तसेच त्यांचा मो.क्रमांक ७७०९००१०३३ यावर संपर्क साधता येईल.